अंबरनाथचा रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर तर मृत्युदर अवघा ० .१९ टक्के
- by Rameshwar Gawai
- Aug 19, 2020
- 280 views
अंबरनाथ (प्रतिनिधी) : कोरोना नियंत्रणासाठी अंबरनाथ शहरात नगर परिषदेच्या वतीने बाधितांचा वेळीच घेतलेला शोध, आग्रही चाचणी, अलगीकरण आणि विलगिकरण यंत्रणेची यशस्वी नियोजन आणि बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार या शिस्तबद्ध कार्यक्रमामुळे अंबरनाथ शहरात रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल ९० टक्क्यांवर गेला आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ नगरपरिषद संचलित दंत
महाविद्यालयातील रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल ९६ टक्क्यांवर गेला आहे. तर येथील मृत्यूदर १ टक्क्याच्याही खाली आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरात आजपर्यंत एकूण ११ हजार ४५२ कोव्हिडं चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर शहरात एकूण ४ हजार ५०२ बाधित रूग्ण आढळले आहेत. शहरातील एकूण रूग्णांपैकी तब्बल ४ हजार ७९ रूग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर शहरात एकूण १७४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथ नगरपरिषद संचालित दंत महाविद्यालयातील कोव्हिड रुग्णालयात आजपर्यंत २ हजार ५४ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील एकूण १ हजार ९८० रुग्ण हे उपचारार्थी बरे होऊन घरी परतले आहेत. या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचा दर हा तब्बल ९६ टक्के इतका आहे. मागील दोन महिन्यात या रुग्णालयात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत हा दर अवघा ० .१९ इतका आहे. यासोबतच शहरातील एकूण रूग्णांचा बरे होण्याचा दर ही ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर काम केले जाते आहे. शहरातील बाधित रूग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. त्या सोबत बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात असल्याने संसर्गाचे प्रमाण काही अंशी रोखण्यात यश येताना दिसते आहे. इंडियन मेडीकल असोसिएशन, पालिकेने नियुक्त केलेले डॉक्टर यांच्या मदतीने दंत महाविद्यालयातील रूग्णांवर प्रभावीपणे उपचार केले जात असल्याचे हे द्योतक आहे. इतर उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्ण वाढीचा वेग हा मंदावला आहे.
शहरातील छाया उपजिल्हा रुग्णालयामध्ये नव्याने आढळणाऱ्या संशयित रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था असलेले २५ खाटांचे एक स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. या ठिकाणी संशयित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोना अहवाल येण्यापूर्वी रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांची वानवा होत असल्याचे दिसून येत होते. संशयित रुग्णांना त्रास होत असल्यास अशा रुग्णांसाठी हा कक्ष फायदेशीर ठरतो आहे. उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण त्यामुळे आता मंदावले असून शहराचा वाढता मृत्युदर देखील स्थिरावला आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम