श्री क्षेत्र औदुंबर स्थानी,भेटीले आले कृष्णामाईचें पाणी
- by Reporter
- Aug 17, 2020
- 812 views
सांगली : रविवार रोजी, श्रीमन नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज "विमल पादुका" मंदिर , श्रीक्षेत्र औदुंबर येथे कृष्णामाईच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने श्रीगुरूंच्या चल पादुकांना व नित्यपूजेतील देवांना मुख्य मंदीरातुन दिगंबरा,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात हलवण्यात आले..
ज्याप्रमाणे वाडीमध्ये दक्षिणद्वार सोहळा घडतो आणि श्रींच्या पादुकांवरून येणाऱ्या पाण्यामध्ये स्नान करून आपण कृतकृत्य होतो अगदी तसेच क्षेत्र औदुंबर येथे ही होते. औदुंबर क्षेत्राला जेव्हा कृष्णामाईच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी मुख्य गाभाऱ्या पर्यन्त येते , तेव्हा पुजारीवर्ग गाभाऱ्याचा उंबरठ्याला दोन तीन विटांचा थर घालून बांध घालतात. कृष्णामाईचे पाणी जेव्हा त्या थराच्याही वर जाऊ लागते तेव्हा पुजारीवर्ग तो बांध काढून घेतात आणि आत कोंडलेले पाणी श्रीगुरूंच्या "विमल पादुकांन" वरून परत बाहेर येते तेव्हा इतर भक्त आणि पुजारीवर्ग त्या पाण्यात स्नान करतात. असा हा पुण्यपावन सोहळा औदुंबर क्षेत्री घडत असतो.
त्यानंतर श्रीगुरूंच्या चल पादुका व नित्यपूजेतील देवांना घेऊन पुजारीवर्ग श्री मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि त्यानंतर देवांना उंचावर हलविण्यात येते. पुढे कृष्णामाईच्या पाण्याची पातळी कमी होई पर्यंत श्रींचे नित्योपचार जिथे देवांना स्थापन केले असते तिथेच पार पाडले जातात.
अशाप्रकारे साक्षात श्रीगुरूंच्या पादुकांन वरून येणारे पाण्यामध्ये आपण स्नान करू शकत असल्याने ज्या सोहळ्याची भक्त आनंदाने वाट पाहत असतात, तो आनंददायी आणि पुण्यपावन सोहळा आज औदुंबर क्षेत्री दिगंबरा,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात पार पडला.
रिपोर्टर