
उल्हासनगर येथील भाजपा नेत्यावर जमीन हडप केल्याचा गंभीर आरोप,सक्षम प्राधिकरणाच्या पुराव्यानंतर तात्काळ कारवाई करणार-तहसीलदाराचा खुलासा .
- by Rameshwar Gawai
- Jul 26, 2020
- 1069 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : खोटे शेतकरी दाखले सादर करुन व्यापारी व बिल्डरांनी शेकडो एकर जमीन खरेदी केली. यातील काहींनी तर आदीवासी समाजाला देशोधडीला लावले आहे आणि हे सर्व बनावटगिरी सुरु आहे ते उल्हासनगर येथील भाजपाचे वरिष्ठ नेते महेश सुखरामाणी यांच्या नेतृत्वाखाली असा गंभीर आरोप परीहित संस्थेचे अध्यक्ष विशाल गुफ्ता यांनी केली असून तशा प्रकारच्या तक्रारी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर केल्या आहेत. तर सदरचे ७/१२ हे खोटे आहेत असे सक्षम प्राधिकरणाने पुराव्यानिशी कळविल्यास किंवा तसे सिद्ध झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल असे कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
उल्हासनगर येथील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि भाजपाचे आमदार पदाचे दावेदार व भावी उमेदवार महेश सुखरामाणी व त्यांचे साथीदार सुरेश तलरेजा सतिश तुनिया कांबा ग्रामपंचायत हद्दीत यांनी स नं १५ /७ ही जमीन खरेदी केली होती. ती करीत असताना महेश सुखरामाणी यांनी मौजे म्हारळ, सतीश तुनिया यांनी ६९ /२३ /१ ही जमीन तर सुरेश तलरेजा यांनी मौजे पाले ता अंबरनाथ येथील शेतकरी असल्याचा दाखला सादर करुन घेतली होती.
परंतु यातील महेश सुखरामाणी यांचे शेतकरी दाखले बोगस असल्याच्या तक्रारी नंतर सिद्ध झाल्याने ही जमीन सरकार जमा झाली होती. तर इतर सहकारी सतीश तुनिया आणि सुरेश तलरेजा यांचे अनुक्रमे पाली व इतर दाखले बोगस व बनावट असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे असे विशाल गुफ्ता यांनी सांगितले आहे . तसेच याच कागदपत्रांच्या आधारे कांबा येथील हॉटेल रेडचिल्ली च्या शेजारी असलेल्या स. न . १२०/१,१२१/१ ही शेकडो एकर जमीन खरेदी केली. त्यामुळे मुळातच खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून जमीन खरेदी कशी केली जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित करून ही जमीन घेणारे लाल तनवाणी, नरेश भाटिया आणि एस रावलानी यांनी जे शेतकरी असल्याचे दाखले दिले आहेत ते ही खोटे व हे तेथील खातेदार शेतकरी नाहीत असे चारही तलाठी यांनी लिहून दिले आहे असे असताना तहसीलदार दीपक आकडे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर का कारवाई करित नाही असा सवाल गुप्ता यानी उपस्थित केला आहे.
सर्व पुरावे सादर केले आहेत कागदपत्रे दिले आहे. तर सिरोही शिंवगंज जिल्हाधिकारी यांनी भूमी प्रमाणपत्र हे किसान प्रमाणपत्र होऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे तरी पण कारवाई होत नाही. म्हणून अखेर हे सर्व शेतकरी आहेत किंवा नाहीत हे जाहीर करावे आणि परीहित संस्थेकडून रोख २५ लाख रुपये रिलीफ फंडास घ्यावे असे खुले आव्हान विशाल गुफ्ता यांनी दिले आहे. या नंतरही काही कारवाई केली नाही तर नवी दिल्ली येथे जंतरमंतर मैदानावर उपोषण, धरणे निदर्शने व आंदोलन करण्यात येईल असा इशारा देऊन सदर जमीन अधिनियम १९४८ नुसार ८४ (क) प्रमाणे सरकार जमा करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणा बाबत कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांना विचारले असता ते म्हणाले "तक्रारीच्या अनुषंगाने ७ /१२ च्या विधीग्राह्यतेबाबत संबंधित तहसीलदारांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्या संदर्भात खुलासा प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात येईल. सदर ७ / १२ ला आज रोजी ग्रहित मुल्य असल्यामुळे सक्षम प्राधिकरणाकडून ७ /१२ खोटा आहे हे सिद्ध झाल्याशिवाय पुढील कारवाई करणे उचित होणार नाही. खुलासा प्राप्त होताच सदर फेरफार करणेबाबत उपविभागीय अधिकारी कल्याण यांचेकडे त्वरित प्रस्ताव पाठविण्यात येईल असे सांगितले आहे .
तर आरोप केलेल्या भाजपाचे वरिष्ठ नेते महेश सुखरामणी यांना विचारले असता ते म्हणाले" विशाल गुप्ता हे माझे चांगले मित्र आहेत, मला माहीत नाही त्यांनी असे आरोप का केले. माझा यांच्याशी काही संबंध नाही.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम