अंबरनाथच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर

शहरातील १६९ खाजगी डॉक्टर्स तीन शिफ्टमध्ये देतायत रुग्णसेवा . नुकतीच वैद्यकीय पदवी मिळविलेले ५६ तरूण डॉक्टर्सही रुग्णसेवेत

अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रातकोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे गेल्या काही दिवसात दिसून आले असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. अंबरनाथच्या दंत महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये शहरातील खाजगी डॉक्टर्स व मुंबई पुण्यातील नुकतीच वैद्यकीय पदवी मिळवलेल्या तरुण डॉक्टरांच्या मदतीने रुग्णसेवा देण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात येथे उपचारार्थ दाखल झालेल्या १२२४ रुग्णांपैकी १०३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे अंबरनाथमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर गेले आहे.

अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने सुरु  अंबरनाथच्या दंत महाविद्यालयांत सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ५०० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र सध्या ३०० खाटा उपलब्ध आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर स्वतंत्र कक्षात उपचार केले जात असून ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. आवश्यकतेनुसार येथील खाटांचे प्रमाण वाढवले जाणार आहे. आवश्यकतेनुसार ७५० खाटांची व्यवस्था इथे करणे शक्य होणार आहे. शहरात झपाट्याने वाढणारी कोरोना रूग्णांची संख्या, शंभराहून अधिक जणांचा झालेला मृत्यू, कंत्राटी सेवेतील गलथानपणा आणि एकुणच सरकारी व्यवस्थेवरील अविश्वास या प्रतिकुल परिस्थितीने खचून न जाता अंबरनाथमधील १६९ खाजगी डॉक्टर्स रोटेशननुसार कोविड रुग्णालयात सेवा देत आहेत. खाजगी तीन तीन डॉक्टर्स तीन शिफ्टमध्ये अहोरात्र या रुग्णालयात सेवा देत आहेत. याशिवाय मुंबईतील श्रीमती के. जी. मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय आणि चिंचवड येथील लोकमान्य मेडिकल महाविद्यालयातून नुकतीच वैद्यकीय पदवी मिळविलेले ५६ तरूण डॉक्टर्स या रुग्णालयात रुग्णसेवा सेवा देत आहेत. त्यात ३२ तरुणींचा समावेश आहे. शहरातील हॉटेल्समध्ये या डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पीपीई कीट घालून सहा ते आठ तासांची सेवा ही मंडळी देत आहेत. शहरातील सात सर्जन ‘ऑन कॉल' सेवेसाठी येथे उपलब्ध आहेत. प्रत्येक वॉर्डात सौम्य आवाजात स्पीकर्सद्वारे एफएम रेडिओ ऐकण्याची सोय केली आहे. पहिल्या मजल्यावर विरंगुळा केंद्र उभारून त्यात रुग्णांसाठी कॅरम, टी.व्ही. आदी मनोरंजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सकाळी चहा-नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळी जेवण तसेच औषधेही विनामूल्य दिली जात आहेत.पदवी मिळताच अशा आव्हानात्मक परिस्थितीत स्वत:ला आजमाविण्याची संधी मिळाली आणि आम्ही ती स्वीकारली. इथे ज्येष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आम्ही रुग्णांची शुश्रुषा करीत आहोत. पालिका प्रशासनाने आमची राहण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या या महामारीतच आम्हाला शिकण्याची चांगली संधी मिळाली असून आम्ही सुद्धा काहीतरी चांगले करून दाखवू असा विश्वास मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालयातील डॉ. अलका सिंग यांनी व्यक्त केला. शहरातील माझ्या सहकारी डॉक्टरांसोबत कोविड रुग्णालयात सेवा देण्यात आनंद आहे. महाविद्यालयातून नुकतीच पदवी घेऊन बाहेर पडलेली युवा टीम आमच्यासोबत आहे. या रुग्णालयात लागणारी सर्व व्यवस्था पालिका प्रशासन तत्परतेने उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे सर्वजण आनंदाने काम करीत असल्याचे डॉ. नील जटाले यांनी सांगितले. अंबरनाथ शहरातील खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या तीनही संघटनांनी एकत्र येऊन आपल्या शहरातील कोरोनाच्या या महामारीत आपली जबाबदारी पार पाडण्याचे निश्चित केले असून रोज तीन तीन डॉक्टर तीन शिफ्टमध्ये या ठिकाणी सेवा देत आहेत. इतकेच नव्हे तर हे रुग्णालय सुरु करण्यासाठीही पालिका प्रशासनाच्या बरोबरीने आम्ही सर्व डॉक्टर सहभागी झालो आहोत. हे रुग्णालय सुरु होण्याच्या आधी शहरात दोन ठिकाणी फिव्हर टेस्टिंग सेंटर आम्ही सर्व डॉक्टरांनी मिळून सुरु केले होते. आम्ही शहरात व्यवसाय करीत असताना शहरावर गंभीर संकट आल्याने त्यात आपलेही योगदान हवे या हेतूने आम्ही सर्व यात सहभागी झालो असल्याचे अंबरनाथ मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. गणेश राठोड यांनी सांगितले. 

पालिका प्रशासनाने या कोविड रुग्णालयावर लक्ष केंद्रित केले आहे. या रुग्णालयातील रुग्णांना आणि त्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व अन्य सहकारी अधिकारी कर्मचारी याना काहीही कमी पडणार नाही याची आम्ही दक्षता घेतली आहे. अनुभवी आणि युवक असे दोन्ही प्रकारचे डॉक्टर मोठ्या संख्येने या रुग्णालयात सेवा देत आहेत. म्हणूनच येथे चांगले उपचार आणि सेवा दिली जात आहे. आणि त्याचा दृश्य परिणामही दिसत असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले. अंबरनाथ शहरातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची आकडेवारी काही वेळेस चुकीची वाटते. मात्र यात कोणतीही लपवा छपवी करण्यात येत नाही. या कोविड रुग्णालयात महिन्याभरात केवळ दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्या दोघांचे वय ऐशी वर्षांपेक्षा जास्त होते. मुंबई, ठाणे वा अन्य शहरातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्याची निवासाची नोंद हि अंबरनाथची असल्याने आकडा मोठा दिसतो असेही डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले.पालिकेकडे आरोग्य विभाग सांभाळण्याची सक्षम यंत्रणा नाही. कोरोनाच्या या संकटाच्या काळात रुग्णांना आणि त्यांची सर्व काळजी घेणारे डॉक्टर, नर्स व अन्य स्टाफ यांना कोणतीही कमी पडू नये याची काळजी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने घेत आहेत. इतक्या कमी वेळात इतकी मोठी यंत्रणा पालिकेच्या स्तरावर उभी करणे हे आव्हानात्मक काम सर्वांनी मिळून पूर्ण केले आहे. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, उद्योजक, सामाजिक संघटना या सर्वांनी मिळून काम केल्याने हे शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी आणि पालिका प्रशासक जगतसिग गिरासे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट