बाधित रूग्णांची डॉक्टरांकडून घरीच होणार तपासणी
आयटीआयमध्ये २०० खाटांचे विलगीकरण कक्ष सज्ज.
- by Rameshwar Gawai
- Jul 09, 2020
- 714 views
अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथमधील कमी लक्षणे असलेल्या ज्या रूग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. अशा रूग्णांना प्रकृतीत काही त्रास उदभवल्यास, पालिकेच्या मदत कक्षास संपर्क साधताच, रूग्णांच्या घरी भेट देत, डॉक्टरांकडून तपासणी करण्याचे नियोजन नगरपालिकेने केले आहे. यासाठी ४० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शहरात आयटीआय येथे सर्व सुविधांसह अतिरिक्त २०० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले असून आठवड्याभरात दोन हजार रूग्णांची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष सज्ज होणार आहे.
अंबरनाथ शहरात करोना बाधित रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले कोविड केअर सेंटर, विलगीकरण कक्षांची क्षमता रूग्णांच्या तुलनेत अपुरी पडत आहे. त्यात नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बदलापूर येथील आपल्या भेटीत शहरातील आरोग्य यंत्रणेची क्षमता वाढवण्याचे आदेश अधिकार्यांना दिले होते. त्यानुसार नवनियुक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी युध्द पातळीवर उपाय योजना राबण्यास सुरूवात केली आहे. सध्या लक्षणे नसलेल्या १३८ बाधित रूग्णांना घरातच विलगीकरणात ठेवत उपचार सुरू आहेत. मात्र अशा रूग्णांना यापुढे घरपोच डॉक्टरांकडून तपासणी होणार आहे. यासाठी नगरपालिकेने ४० डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. घरात विलगीकरण करत उपचार सुरू असलेल्या एखाद्या रुग्णाच्या प्रकृतीत काही त्रास जाणवल्यास, संबंधित रूग्णाने तात्काळ नगरपालिकेच्या मदत कक्षात संपर्क साधायला आहे. अवघ्या काही मिनिटात डॉक्टर पीपीई कीट परिधान करत, रूग्णाच्या घरी त्याची तपासणी करणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले आहे. या प्रत्येक भेटीसाठी डॉक्टरांना शंभर रुपये मानधन देण्यात येणार असून, आयएमएच्या डॉक्टरांचे यात मोठे सहकार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वाढती रूग्णसंख्या पाहता, शहरात दोन हजार रूग्णांना ठेण्यात येईल या क्षमतेचे विलगीकरण कक्ष सज्ज करण्यात येत आहेत. त्यानुसार कल्याण बदलापूर मार्गावर असलेल्या आयटीआय येथे २०० खाटांचे विलगीकरण कक्ष सोमवारी सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी इतर मुलभूत सुविधांसह, चोविस तास वैद्यकीय अधिकारी आणि एखादा रूग्ण अस्वस्थ झाल्यास, त्यासाठी दोन ऑक्सीजन सिलेंडरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच बदलापूर येथील बीएसयुपी प्रकल्प आणि अंबरनाथ येथील प्रसादम या गृह प्रकल्पातही आणखी ५०० खाटांची क्षमता असलेले विलगीकरण कक्षाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
शहरातील वेगाने वाढती रूग्णसंख्या पाहता, कोविड सेंटरची क्षमता एक हजार पर्यंत करण्याचा तसेच रूग्णांची प्रकृती बिघडल्यास, अस्वस्थ रूग्णांची धावपळ थांबवण्यासाठी शंभर आयसीयु कक्ष सुरू करण्याचा मानस असल्याचेही, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले. मात्र या सर्व यंत्रणेसाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांची गरज भासणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाकडे तात्काळ मदत पुरवण्याबाबत पत्र व्यवहारही करण्यात आला आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम