उल्हासनगरातील सत्य साई प्लॅटिनम कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना हीन दर्जाची वागणूक .
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल .
- by Rameshwar Gawai
- Jul 05, 2020
- 1004 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगरच्या सत्यसाई प्लॅटिनम या खाजगी कोव्हीड - १९ हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असूनही सर्वसामान्य रुग्णांना दाखल केले जात नाही अनेक तास ताटकळत ठेवले जात आहे , त्याचप्रमाणे पिण्याचे गढूळ पाणी देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांनी केला आहे .
या संदर्भात त्यांनी काही व्हिडीओ व्हायरल केले आहेत , या व्हिडीओ मध्ये एक ७२ वर्षीय महिला जमिनीवर बसून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे या महिलेला उपचारासाठी कित्येक तास ताटकळत बसावे लागले असून दुसऱ्या व्हिडीओ मध्ये रुग्णांना गढूळ पाणी देत असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे . ही व्हिडीओ शूटिंग त्याच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेच्या नातेवाईकांनी बनविल्याचा आरोप करून रुग्णालय प्रशासन त्या कोरोना बाधित महिलेस जाणून - बुजून त्रास देत आहे , या त्रासाला सदर महिला कंटाळली होती त्यामुळे तिला तिच्या नातेवाईकांनी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले असल्याचा गंभीर आरोप सरिता खानचंदानी यांनी केला आहे , गरीब , केशरी कार्डधारक किंवा महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत स्वस्तात उपचार या रुग्णालयात केला जातो ही देखील ढोंगबाजी आहे , उल्हासनगर मनपाला शासनाकडून ७ करोड रुपयांचा निधी तसेच मनपा प्रशासनाने ५१ लाखांचा निधी दिला आहे तो निधी कुठे वापरला गेला आहे हे देखील एक कोडे असल्याचे त्या म्हणाल्या , याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासन , आरोग्य मंत्री राजेश टोपे, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून तक्रारी केल्या आहेत .
डॉ सुधाकर शिंदे ( मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा फुले आरोग्य योजना ) ; या संदर्भात माझ्याकडे तक्रार करण्यात आली आहे मात्र हे रुग्णालय महानगरपालिकेच्या अखत्यारीत असल्याने तेथील प्रशासनाने त्याकडे लक्ष घालावे अशी सूचना मी केली आहे .
लिलाबाई आशान ( महापौर , उल्हासनगर ) व्हायरल झालेले व्हिडीओ बनावट आहेत, रुग्णांना शुद्ध पाणी देण्यात येते, जी वृद्ध महिला व्हिडीओ मध्ये दिसत आहे ती पूर्णपणे बरी झाली आहे, जर एखाद्या रुग्णाला कोणी त्रास देत असेल तर त्यांनी पोलीस ठाणे आणि मनपा प्रशासनाकडे तक्रार करावी, ठाणे जिल्ह्यात कोव्हीड - 19 रुग्णांसाठी सर्वाधिक व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची व्यवस्था असलेले सत्यसाई हे एकमेव हॉस्पिटल आहे , महात्मा फुले योजना आणि केसरी कार्ड द्वारे मोफत इलाज मिळावा यासाठी रीतसर मार्गाचा अवलंब करावा .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम