
सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर १२ तासांमध्येच अॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ निर्णय
भारत सरकारने टिकटॉकसहीत ५९ चिनी अॅपवर घातली बंदी
- by Reporter
- Jun 30, 2020
- 427 views
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याचा आधारे भारत सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अॅपसह एकूण ५९ अॅपवर बंदी घातली. भारत सरकारच्या या निर्णयानंतर १२ तासांच्या आतमध्ये भारतामध्ये गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. मात्र या संदर्भात अॅपल आणि गुगलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी या दोन्ही महत्वाच्या प्लॅटफॉर्मवरुन हे अॅप हटवण्यात आलं आहे.
“अॅपलच्या अॅप स्टोअरवरुन तसेच गुगल प्ले स्टोअरवरुन टिकटॉक हटवण्यात आलं आहे. भारत सरकारने काल ५९ अॅप्सवर बंदी घातली. ही अॅप्स भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी असून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी या अॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे असं सरकारने सांगितलं होतं,” असे ट्विट एएनआयने केलं आहे.
त्यामुळे आता युझर्सला टिकटॉक अॅप नव्याने डाउनलोड करता येणार नाहीत. टिकटॉक हे एक व्हिडिओ मेकिंग अॅप असून जगभरामध्ये हे अॅप वापरणारे सर्वाधिक युझर्स भारतात आहेत. या अॅपच्या मदतीने अनेक जण रातोरात सेलिब्रिटी झाल्याचीही उदाहरणे आहेत. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटलं आहे.
वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.
भारत आणि चीन सैन्यात गलवान खोऱ्यात संघर्ष होण्याच्या आधीपासून म्हणजे देशात करोनाचा फैलाव वाढू लागल्यापासूनच चिनी वस्तूंप्रमाणे चिनी मोबाइल आणि अॅपवरही बहिष्कार घालण्यासंदर्भात समाजमाध्यमांवरून मोहीम चालवली जात होती. ही अॅप वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारीही सातत्याने येत होत्या. विशेषत: टिकटॉक या लोकप्रिय अॅपवरून प्रसारीत केल्या जाणाऱ्या चित्रफिती आणि संवाद यांच्याविषयी अनेकदा वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी या अॅपवर घातलेल्या बंदीचे स्वागत होत आहे.
रिपोर्टर