कोरोनाचं औषध वादाच्या भोवऱ्यात, बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
- by Reporter
- Jun 27, 2020
- 456 views
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावर पहिलं औषध काढल्यामुळे गेल्या काही दिवसांत ते चर्चेचा विषय आहे. कोरोनावर औषध सुरू झाल्यापासून बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यासंबंधी बाबा रामदेव आणि इतर ४ जणांवर राजस्थानच्या जयपूर इथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोरोनावर औषध म्हणून कोरोनिलचा अपप्रचार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
कोरोनाचं औषध म्हणून कोरोनिलबद्दल भ्रामक प्रचार केल्याच्या आरोपाखाली जयपूरमध्ये ज्या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात रामदेव आणि पतंजलीचे बालकृष्ण यांचीही नावं आहेत. शुक्रवारी जयपूरमधल्या ज्योतिनगर पोलीस स्टेशनमध्ये ही एफआयआर दाखल करण्यात आली होती.
या औषधामुळे योगगुरू रामदेव बाबा यांच्यासमोर अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. आधी केंद्र आणि राज्य सरकारने या औषधावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पतंजलीने ज्या डॉक्टरांच्या सहयोगाने आपण जयपूरच्या निम्स रुग्णालयात या औषधाचं क्लिनिक ट्रायल केल्याचं सांगितलं तेच डॉक्टर पलटले.
आपल्या रुग्णालयात कोरोनिल औषधाचं ट्रायल झालंच नाही तर आयुर्वेदिक औषधं फक्त कोरोना रुग्णांना देण्यात आली, असं निम्सचे चेअरमन बीएस तोमर यांनी सांगितलं. बीएस तोमर म्हणाले, "आपल्या रुग्णालयात कोरोनाच्या कोणत्याही औषधाचं ट्रायल झालं नाही. आम्ही कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अवश्वगंधा, तुळस आणि गुळवेल दिलं होतं. बाबा रामदेव यांनी याला कोरोनाचा १०० टक्के उपचार करणारं औषध कसं म्हटलं याबाबत मी आता काही सांगू शकत नाही. याबाबत फक्त रामदेव बाबाच सांगू शकतात" त्यामुळे कोरोनाचं हे औषध सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे.
कोरोनिल लाँच होताच आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले. या औषधाबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितलं. तोपर्यंत औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते. यानंतर उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागानेही पतंजलीला नोटिस बजावली. खोकला-तापच्या औषधासाठी परवाना दिला होता, कोरोना औषधासाठी परवाना कसा मिळाला, याची विचारणा केली. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात याचिका करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
रिपोर्टर