पाकिस्तानी दुतावास बनला हेरगिरीचा अड्डा

पाकिस्तानने अतिशय निर्लज्ज पद्धतीने इस्लामाबाद येथील भारतीय दुतावासातील दोन ज्येष्ठ अधिका-यांना अपमानित केले. पाकिस्तानातील इमरान खानचे सरकार याप्रकरणी अजिबात गंभीर नसून भारताच्या विरोधात कुरापती करण्यातच त्यांना धन्यता वाटते. यापार्श्वभूमीवर भारत सरकारने दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचा-यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला असून हा अतिशय योग्य निर्णय मानला जातोय. भारताशी थेट युद्ध करण्याची हिंमत नसलेला पाकिस्तान आपल्या दुतावासात आयएसआयच्या गुप्तहेरांना पाठवून षडयंत्र रचत असतो आणि भारतात लपून बसलेले देशद्रोही त्यांना मदत करत असल्याचे दिसून येते. भारताला यापूर्वीच पाकिस्तानच्या या षडयंत्राची कल्पना होती. परंतु, गेली अनेक वर्षे यासंदर्भात कठोर भूमिका घेण्यात आली नव्हती. मात्र, मोदी-शाह यांच्या जोडीने आता पाकिस्तानला त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देणे सुरू केले आहे. तसेच पाकिस्तानच्या कुरापतींना प्रतिबंध लावण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातूनच पाकिस्तानच्या दिल्ली उच्चायुक्तालयातील 50 टक्के कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचे कर्मचारी राजदूताचा मुखोटा लावून नेहमीच दिल्लीत वावरत आले आहेत. भारतात येऊन सैन्याशी निगडीत महत्त्वाची कागदपत्रे मिळवणे असा त्यांचा एकमेव उद्देश असतो. अनेकदा त्यांना या हेरगिरीत यश देखील मिळते. त्यासोबतच भारतातील दहशतवादी संघटनांना रसद आणि मदत देण्यातही ते सहभागी असतात. यापूर्वी काश्मिरातील फुटीरवाद्यांसाठी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात पायघड्या अंथरल्या जात असते. परंतु, केद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून त्यांच्या उठाठेवीला प्रतिबंध लावण्यात आलाय. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचा जासूस निशांत अग्रवाल याला महाराष्ट्रातील नागपुरातून अटक करण्यात आली होती. निशांतवर ब्रह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भातील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. निशांत अग्रवाल सारखे अनेक देशद्रोही आमच्या देशात आहेत. गेल्या मे महिन्यात दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आबिद हुसेन आणि ताहिर हुसेन अशा दोन अधिका-यांना हेरगिरी करताना रंगेहाथ अटक केली होती. भारताने डिप्लोमॅटिक इम्युनिटीमुळे त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना 24 तासात देश सोडण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तान उच्चायुक्तालयावर भारत सरकार नजर ठेऊन आहे. परंतु, यासोबतच देशात लपून बसलेल्या जयचंदांना मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षा देण्याची गरज आहे. पाकिस्ताची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणा-या निशांत अग्रवालचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. संरक्षण मंत्रालयाच्या डीआरडिओशी संबंधीत ब्रह्मोस एरोस्पेस या कंपनीमध्ये कार्यरत होता. ब्रह्मोस एरोस्पेस ही खासगी कंपनी असून भारत सरकारचे डिआरडीओ आणि रशियाच्या सैनिकी उद्योग समुहाचा संयुक्त प्रकल्प आहे. देशाशी गद्दारी करणा-या निशांत सारख्या लोकांना विचारले पाहिजे की, ते कुठल्या प्रलोभनाला बळी पडून असला देशद्रोह करतात. 

 

हेरगिरीचे हे प्रकार फार पूर्वीपासून चालत आले असून 2016 साली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील महमूद अख्तर याला संवेदनशील कागदपत्रांसह अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची भारतातून हकालपट्टी करण्यात आली होती. यावरून पाकिस्तानी उच्चायुक्तालय हा हेरगिरीचा अड्डा असल्याचे स्पष्ट होते. जगातील विविध देश एकमेकांची संस्कृती, परंपरा समजावून घेणे आणि परस्परसंबंध दृढ बनवण्यासाठी दुस-या देशात उच्चायुक्तालय किंवा दुतावास सुरू करतात. काही देश दुतावासांच्या पलिकडे जाऊन सांस्कृतिक केंद्र आणि ग्रंथालय देखील चालवतात. दिल्लीत अमेरिका, इटली, ब्रिटन, स्पनेन, रशिया इत्यादी देशांचे सांस्कृतिक केंद्र देखील आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून चर्चा, परिसंवाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासोबतच अमेरिका, इराण, जापान इत्यादी देश दिल्लीत आपल्या अभ्यासक्रमाचा शाळा देखील चालवतात. त्यांच्या दुतावासात काम करणा-या कर्मचा-यांची मुले या शाळांमध्ये शिकतात. परंतु, पाकिस्तानी उच्चायुक्तालय अशा सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींपासून नेहमीच लांब राहिला आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात फक्त भारताची जासूसी केली जाते. भारतात 1960 साली स्थापन झालेल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या इमारतीत आजवर कुठलाही कार्यक्रम आयोजित झालेला नाही. दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात विविध दुतावासांसाठी 1958 नंतर जमीन आवंटित करण्यात आली होती. त्यांतर्गत पाकिस्तानी उच्चायुक्तालयासाठी उत्तम जागा देण्यात आली. परंतु, भारताशी चांगले संबंध प्रस्तापित करण्याऐवजी पाकिस्तानने आजवर हेरगिरीसारखे उद्योग करण्यातच धन्यता मानली आहे. भारताकडून 1948, 1965, 1971 आणि कारगिलच्या युद्धात दारूण पराभव होऊनही पाकिस्तानच्या वर्तनात तसूभरही सुधारणा दिसली नाही. पाकिस्तानच्या छत्रछायेत मौलाना मसूद अझर आणि हाफिज सईद सारखे दहशतवादी भारताच्या विरोधात युद्ध लढत आहेत. मौलाना मसूद अझर आणि हाफिज सईदच्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानची आयएसआय थेट मदत पोहचवते. त्याबळावर त्यांच्या लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना भारतात घातपाती कारवाया करतात. भारताने केलेल्या सर्जिकल आणि एअर स्ट्राईकनंतर या संघटनांचे कंबरडे मोडले आहे. आता पाकिस्तान या संघटनांना पुन्हा बळकटी देण्याच्या उद्देशाने षडयंत्र रचतोय. भारताच्या विरोधात गरळ ओकणा-या या दशतवाद्यांची पाकिस्तान सरकार वारंवार पाठराखण करते. परंतु, भारत त्यांचा समाचार घेण्यास सक्षम असून त्यांच्या विरोधात अविलंब निर्णायक कारवाई करण्याची गरज आहे. कारण, शिशुपालाची शंभरी भरली की, सुदर्शन चक्र सोडणे हाच खरा राजधर्म आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट