
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा उल्हासनगर दौरा.आरोग्य सेवेचा घेतला आढावा.
- by Rameshwar Gawai
- Jun 09, 2020
- 568 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल दुपारी उल्हासनगर महापालिका आणि मध्यवर्ती रुग्णालयाची पाहणी केली , आयुक्त समीर उन्हाळे व मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांची भेट घेऊन शहरात कोरोना संदर्भात रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा , रोगप्रतिकारक साधने याबाबत विचारणा केली .
उल्हासनगर शहरांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जवळपास ५८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अद्याप पर्यंत सापडले आहेत, रुग्णांना प्राथमिक सुविधा, जेवण मिळत नाही त्याचसोबत कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर्स , नर्सेस यांच्याकडे देखील दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत , या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी उल्हासनगर चा दौरा केला असल्याची माहिती भाजप नगरसेवक मनोज लासी यांनी दिली .
यावेळी झालेल्या बैठकीत किरीट सोमय्या यांनी महापालिका आयुक्त समीर उन्हाळे व मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे आणि दोन्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आरोग्य सेवेसाठी पुरेसे डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी उपलब्ध करून घ्यावेत, यासाठी अस्थायी स्वरूपात भर्ती करण्यात यावी , खाजगी रुग्णालयात कोरोना उपचारास परवानगी देण्यात यावी, त्या सोबतच ऍम्ब्युलन्सची संख्या वाढविणे आणि मृतदेह हाताळतांना निर्जंतुकीकरणा बाबत दक्षता दाखवावी अशा सूचना दिल्या आहेत .
यावेळी भाजप आमदार कुमार आयलानी , स्थायी समिती सभापती राजेश वधारीया, मनोज लासी , जमनू पुरुस्वामी , लाल पंजाबी व भाजपचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम