उल्हासनगरच्या आयुक्तपदी समीर उन्हाळे. सुधाकर देशमुख यांची तडकाफडकी बदली .

उल्हासनगर / प्रतिनिधी : काल अचानक उल्हासनगरचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे आदेश येऊन थडकले आणि शहरात उलट सुलट चर्चांना उधाण आले. उगवत्या सूर्याला नमस्कार व मावळत्याची कुचेष्टा,हे उल्हासनगरचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. नवनियुक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची रातोरात आरती ओवाळण्याची  स्पर्धा ते रूजू होण्याआधीच सुरू झाली आहे. 

गेल्या तीन वर्षात राजेंद्र निंबाळकर,  गणेश पाटील,अच्युत हांगे, सुधाकर देशमुख व आता समीर उन्हाळे असे पाच आयुक्त उल्हासनगरच्या नशीबी आले.मागील तीन आयुक्त वादग्रस्त ठरलेले असताना सुधाकर देशमुख हे आयुक्त म्हणून रूजू होताच त्यांच्याकडून उल्हासनगरकरांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या होत्या. सुरूवातीस त्यांनी धडाकेबाज निर्णय घेऊन उल्हासनगरच्या आशा पल्लवित केल्या.युवराज भदाणेची अतिरिक्त उपायुक्त पदं काढून घेणे, रखडलेली चौकशी सुरू करणे, मालमत्ता कर वसूलीवर लक्ष केंद्रित करणे, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जरब  बसविणे, शिस्त लावणे, यासारखी अत्यावश्यक कामं त्यांनी सुरूवातीस केली.

उल्हासनगरच्या आर्थिक दिवाळखोरीचा लेखाजोखा त्यांनी श्वेतपत्रिकेद्वारे जगासमोर आणला व सर्वांना खडबडून जागे केले.अनावश्यक कामं रद्द करणे, पुर्वी झालेल्या व सुरू असलेल्या कामांचा थर्डपार्टी ऑडिट करणे,या कार्य-पद्धतीमुळे ठेकेदार व महापालिकेतील गोल्डन गॅन्गवर जरब  बसवली. चिक्की, महिला बाल कल्याण समिती अंतर्गत अंगणवाडीच्या मुलांसाठी निघणारे टेंडर, खेमानी येथील अनधिकृत व मनमानी पद्धतीने मंजूर झालेल्या तीन कोटीच्या शाळा इमारतीचे काम रद्द करणे,यासारखे धडाकेबाज निर्णय घेऊन आपला ठसा उमटवला. यंदाच्या अर्थसंकल्पाचे वस्तुनिष्ठ चित्र त्यांनी सर्वांसमोर ठेवले, ते स्वतः कार्यालयीन शिस्त व वेळेचे बंधन पाळत होते,म्हणून प्रशासनावर त्यांची पकड होती.

उल्हासनगरच्या मातीचे वैशिष्ट्य असे की, येथे कितीही चांगला अधिकारी व्यक्ती आला तरी तो काही दिवसात बिघडतो. उल्हासनगर मधील गोल्डन गॅन्ग व काही भ्रष्ट अधिकारी प्रामाणिक अधिका-यास बाटविण्याचे  बिघडवण्याचे काम कुशलतेने करतात.नव्हे ते त्यात तरबेजच आहेत.असाच एक वादग्रस्त अधिकारी आयुक्तांच्या कमजोरी हेरून त्यांना  वश करून घेतो.काही राजकीय नेते तर जणू काही त्याचे जन्मोजन्मीचे नाते आहेत,असे भासवून आपल्या जाळ्यात ओढतात,एक फाईल चोर भाजपा नेता जो आपल्या पत्नीच्या नगरसेवक पदाच्या बुरख्याआड, मॅनेजमेंट गुरू म्हणून वावरतो. अशा लोकांचा सहवास लाभल्याने सुधाकर देशमुख हे देखील निष्प्रभ ठरू लागले होते.एका जनसंपर्क अधिकारी दर्जाच्या अधिका-यावर ते एफआयआर दाखल करू शकले नाहीत. कोरोनाच्या भीषण संकट काळात त्या अधिका-यास कोणतीही जबाबदारी देऊ शकले नाहीत. आणि कोरोना मुळे तर देशाप्रमाणेच उल्हासनगरचे जनजीवन ही विस्कळीत झाले. सर्व कामं,योजना बासनात गुंडाळून कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी सज्ज व्हावे लागले.सुरूवातीस सुधाकर देशमुख यांनी कोरोना विरूद्ध यशस्वीपणे लढा दिला.परंतु काही  मोजके नेते यांच्या आहारी गेल्याने ते अपयशी ठरू लागले.पकड ढिली होऊ लागली.कोनार्क कंपनीला दिलेला परतावा, पाॅटहोल भरण्याचे वारेमाप काम, निकृष्ठ दर्जाचे रस्ते, त्यात वापरण्यात येणारे डांबर व रेती याकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले.

कोरोना नियंत्रणात आणण्याच्या कामात ते अपयशी ठरू लागले.सुरूवातीस एकही रूग्ण नसलेली कोरोनामुक्त महापालिका म्हणून गौरव झालेली महापालिका गेल्या २० ते २५  दिवसात १४०  कोरोनाग्रस्तांवर पोहचली. या कामात ते एकखांबी तंबू प्रमाणे वागले. क्रिटीकेअर रूग्णालयांच्या बेजबाबदार पणाचे ते समर्थन करू लागले. प्रेसनोटचा धडाका,आणि ठराविक पोर्टल व यु ट्यूब चॅनलचा दिलेल्या बाईट्स यावर विसंबून राहू लागले. शिवनेरी प्रमाणे क्रिटीकेअर हाॅस्पिटल सील  केले नाही. तर   खन्ना कंपाऊंड, सम्राट अशोक नगर ब्रह्मणपाडा, हे विभाग हाॅटस्पाॅट ठरले त्यावर नियंत्रण मिळवण्यात त्यांना अपयश आले, आणि हेच त्यांच्या बदलीचे कारण ठरले.

आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली नियमित स्वरूपाची बदली नाही. कारण जेव्हा नियमित बदली होते तेव्हा त्या अधिका-याच्या बदलीचे ठिकाण त्याच आदेशात नमुद केलेले असते.कालच्या आदेशात तसा उल्लेख नाही.म्हणजे ही नियमित बदली नाही.त्यांना उल्हासनगरच्या आयुक्तपदी येऊन जेमतेम काही  महिनेच  झाले आहेत. तेव्हा ही बदली फक्त कोरोना संक्रमणे रोखण्यातील अपयशामुळे झाली आहे, असे समजायला हरकत नाही. तसेच या बदली आदेशाच्या तिस-या परिच्छेदात महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांनी स्पष्टपणे म्हटले आहे-" कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य विचारात घेऊन त्याबाबतच्या उपाययोजना भाग म्हणून सदर आदेश निगर्मित  करण्यात आले  आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट