कोरोना रिपोर्ट येण्याआधीच मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणे उल्हासनगरला महागात पडले . एकुण रुग्ण झाले ९१ .

 उल्हासनगर / प्रतिनिधी :  उल्हासनगर येथिल मध्यवर्ती  रूग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९१  वर पोहचली आहे. त्यातील चार रूग्ण कोरोनाचे बळी ठरले असून ११  रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना संशयित रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल येण्याची वाट न पाहता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्याच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत.  यामुळे कोरोनाच्या प्रसारास रूग्णालयांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत आहे. 

सर्वप्रथम क्रिटीकेअर हाॅस्पिटलने फालवर  लाईन परिसरात राहणा-या एका वयोवृद्ध संशयित रूग्णांचा मृतदेह तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिला होता. दुस-या दिवशी तिचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने फालवर  लाईन परिसरात एकच खळबळ माजली होती. सदर परिसर कंटोनमेंट झोन जाहिर करून ६९   लोकांना क्वारंटाईन  करण्यात आले होते.त्यापैकी सदर महिलेच्या ६०  वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते.सदर क्रिटीकेअर  रुग्णालयाने वापरलेले पीपीई किट बेदरकारपणे भररस्यात टाकून दिले होते. या अक्षम्य हलगर्जीपणा बद्दल कडक कारवाई करण्याऐवजी अवघे २  हजार दंड आकारून पडदा पाडला होता. सोशल मिडियावर बोभाटा झाल्यावरच ही थातुरमातुर कारवाई करण्यात आली होती. 

या घटने पाठोपाठ विठ्ठलवाडी जवळील खन्ना कंपाऊंडमधे राहणा-या एका कोरोनाग्रस्त  संशयित रूग्णाचा मृतदेहही नातेवाइकांच्या ताब्यात देण्याचा प्रकार शासकीय  मध्यवर्ती  रूग्णालयाने केला होता. ही गंभीर बाब उघडकीस आणून ही कोणावरही कारवाई करण्यात आली नव्हती. त्याचाच परिणाम म्हणून या परिसरातील सदर मृताच्या ९  नातेवाईकांचा कोरोना रिझल्ट पाॅझिटिव्ह आलेला आहे. खन्ना कंपाऊंडमधे सदर चाळीत राहणा-या सुमारे ७०  लोकांना क्वारंटाईन  करण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. 


तिसरा प्रकार सेंच्युरी रेयाॅन येथील एका रुग्णाचा मृतदेह रिपोर्ट येण्याआधी  ठाणे येथील रूग्णालयाने नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर सदर रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला.त्यामुळे उल्हासनगर मधे कोरोनाचा प्रकोप दिवसे दिवस वाढतच आहे.  कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा दिवसे दिवस वाढत आहे.खन्ना कंपाऊंडमधे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. परंतू कोरोना संशयित रूग्णाचा मृतदेह नातेवाइकांना अहवाल प्राप्त होण्याआधी का देण्यात आला .  अहवाल येईपर्यंत सदर मृतदेह शवागारात का ठेवण्यात आला नाही.रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले असते,त्यामुळे पुढील अनर्थ टळले असते.  मग या हलगर्जीपणाबद्दल मध्यवर्ती रुग्णालयातील संबंधितांना का जबाबदार मानले जात नाही . उल्हासनगरच्या बाबतीत या प्रकाराची पुनरावृत्ती का होते .  असे प्रश्न शहरवासी दबक्या आवाजात विचारत आहेत.

आयुक्त ,पोलीस,डाॅक्टर, परिचारिका व आरोग्य सेवक हे आपापले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असताना रूग्णालयाचा हलगर्जीपणा कोरोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरत आहे.याबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना चा प्रकोप  नष्ट व्हावा,  शहर कोरोनामुक्त होऊन जनजीवन पूर्ववत व्हावे, अशी सर्वांची मनापासून इच्छा आहे, त्यासाठी रूग्णालयांनीही योग्य ती दक्षता बाळगली पाहिजे, असे मत ज्येष्ट  पत्रकार व विचारवंत  दिलीप मालवणकर व्यक्त केले जात आहे.

संबंधित पोस्ट