बंदिवासातील आत्मनिर्भरता
काय खावे काय प्यावे आता जगावे की मारावे ! घरात कोंडून घेतलेल्या नी आत्मनिर्भर कसे व्हावे!!
- by Adarsh Maharashtra
- May 14, 2020
- 576 views
माणसाला जगण्याची दिशा दाखवणारे अनेक संत महात्मे या जगाने पाहिले आहेत पण संकटाला संधी समजून त्याचा फायदा घ्या असा उपदेश करणारे एकच महापुरुष एका जगात आहेत आणि ते म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी! संकटात संधी शोधा हा उपदेश कानावर पडताच इथल्या वाण्या बनियांनी २० रुपये किलो दराचा तांदूळ ४० रुपये किलोने विकायला सुरुवात केली यालाच म्हणतात संकटाचे रूपांतर संधीत करणे. दुर्दैवाने आमच्या मराठी माणसाला हेच व्यापारी गणित कळले नाही म्हणून तो कर्जबाजारी आणि कंगाल झालाय. असो, पण कोरोनाच्या या संकटात केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून देशवासीयांना दिलासा दिलाय पण हे २० लाख कोटी सरकारी बाबूंच्या लालफिती मधून लोकांपर्यंत येतील तेंव्हा आपले म्हणायचे .पण ज्या देशातील उद्योग धंदे जवळपास २ महिने बंद आहेत त्या उद्योग धंद्याची गाडी रुळावर आणण्यासाठी हे २० लाख कोटी खरोखरच पुरेसे आहेत का? बरे एकीकडे उद्योग धंदे चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे सतत लॉक डाऊनची मुदत वाढवून लोकांना घरात कोंडून ठेवले जात आहे अशा वेळी हे उद्योग धंदे माणसां शिवाय चालणार आहेत का? विज्ञानाच्या जोरावर माणसाने किती जरी प्रगती केली आणि मिनिटाला लाखोंचे उत्पादन देणाऱ्या अत्याधुनिक मशिन्स आणल्या तरी त्या चालवण्यासाठी माणसांचेच हात लागणार आहेत ना? त्यामुळे माणूस हाच उद्योगधंद्याचां मूळ केंद्रबिंदू आहे त्यामुळे उद्योगधंदे सुरू करायचे असतील तर अगोदर कामगारांची व्यवस्था करायला हवी पण आज सर्व परिवहन सेवा बंद असताना कामगार कामाच्या ठिकाणी जाणार कसा? बरे सर्वच कंपन्यांची इतकी क्षमता नाही की कामगारांना कंपनीतच ठेवून पोसता येईल .अने तसे जरी केले तरी कामगार आपले घरदार सोडून कंपनीत किती दिवस राहणार? देशाच्या विकासात इथला शेतकरी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा कामगार याचे मोठे योगदान आहे किंबहुना हेच लोक या देशाच्या विकासाची चाके आहेत पण कोरोनाच्या भीतीने त्यांनाच घरात कोंडून ठेवलेय मग घरात कोंडून ठेवलेल्या हा माणूस काम धंदा करण्यासाठी घराबाहेर कसा पडणार?आणि घराबाहेर पडून त्याने कामधंदा केला नाही तर तो आत्मनिर्भर कसा होणार?जगाच्या आजवरच्या इतिहासात घरात बसून कुणी आत्मनिर्भर झाल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे आपण काय करतोय आणि काय बोलतोय याचे इथल्या सत्ताधाऱ्यांना भान असायला हवे. कोरोनाचे संकट मोठे आहे हे सर्वांना मान्य आहे पण माणूस घरात बसून या संकटाचा मुकाबला करू शकत नाही हे सुद्धा तितकच खरं आहे. आज कोरोनापेक्षा कोरोना बाबत पसरत असलेल्या नको नको त्या अफवांचा जास्त धोका आहे. घराबाहेर पडलेल्या प्रत्येक माणसाला कोरोना होणार आहे किंवा झालाय असे जे चित्र निर्माण करण्यात आलेय त्याचा भयंकर परिणाम जनमानसावर होतोय या अशा गोष्टींमुळे घरात बसलेल्या प्रत्येक माणसाचं आज मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झाले आहे माणूस या बंदीवासामुळे आणि कोरोना बाबत दाखवल्या जात असलेल्या भीतीमुळे हतबल झाला आहे आणि अशा हतबल माणसाला आमचे पंतप्रधान आत्मनिर्भर होण्याचा सल्ला देत आहेत पण तो घरात बसून आत्मनिर्भर होणार आहे का? कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊन हा एकमेव पर्याय नाही आणि तीन वेळा लॉक डाऊन करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही तरी सुद्धा पुन्हा पुन्हा लॉक डाऊनची मुदत का वाढवली जातेय तेच कळत नाही.
इंग्लंड सारख्या देशात मृत्यू दर जादा असूनही तिथले लॉक डाऊन हटवण्यात आले . लॉक डाऊन ठेवायला हरकत नाही पण त्याची कठोरपणे अमलबजावणी होणार नसेल आणि कोरोनाला आळा घालण्यात अपयश येणार असेल तर कशासाठी आणि कितीवेळा लॉक डाऊन करणार? या लॉक डाऊन मुळे घरात कोंडून घेतलेल्या लोकांची मानसिकता बिघडली आहे त्यातून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना व्यतिरिक्त इतर गंभीर आजाराचे जे रुग्ण आहेत त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने कित्येकांना उपचारा विनाच तडफडून मरावे लागते आहे. खास करून हार्टचे जे पेशंट आहेत त्यांना वेळच्या वेळी तपासणी करून घेण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झालाय म्हणूनच लोक ओरडून सांगत आहेत की लोकल ट्रेन जरी सुरू केली नाही तरी रिक्षा,टॅक्सी,ओला, उबेर यासारख्या परिवहन सेवा सुरू करा. दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली मग सार्वजनिक परिवहन सेवेवर बंदी का? हवे तर या सेवा सुरू करताना सोशल डिस्टन्स बाबत नियम घालून द्या. रिक्षा टॅक्सी मध्ये फक्त दोनच प्रवाशांना प्रवासाची परवानगी द्या. बसमधे एका सीटवर एकाच प्रवासी बसवा. स्टँडिंग घेऊ नका पण परिवहन सेवा सुरू करा. सततच्या लॉक डाऊनमुळे लोकांची सहनशीलता आता संपली आहे. लोकांचा संयम सुटला तर लोक रस्त्यावर उतरतील आणि त्यानंतर जे काही घडेल ते भयंकर असेल त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाईल. कारण सततच्या लॉक डाऊन बाबत लोकांच्या मनात असंतोष आहे त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो आणि म्हणूनच हा संभाव्य धोका ओळखून लॉक डाऊनचां हा चौथा टप्पा अखेरचा असेल आणि त्यानंतर लॉक डाऊन उठवले जाईल याबाबत लोकांना विश्वास द्या. जेणेकरून देशातील लोकांना स्वतःच्या असंतोषावर संयम राखता येईल पण जर का दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या लोकांना मोकळा श्वास घ्यायला मिळाला नाही तर लोक रस्त्यावर उतरतील. सरकारने ती वेळ येऊ देऊ नये एवढीच अपेक्षा!
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम