अर्धे अधिक ठाणे टाळेबंदच
वागळे, कोपरी, विजयनगर भागांचा समावेश; दिवा, मुंब्य्रात ठरावीक वेळेत दुकाने खुली राहणार
- by Adarsh Maharashtra
- May 05, 2020
- 1082 views
ठाणे :-महापालिका क्षेत्रातील लोकमान्यनगर-शास्त्रीनगर या भागातील टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली असली तरी करोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने वागळे इस्टेट आणि कोपरी परिसर १० मेपर्यंत, तर विजयनगर परिसर १७ मेपर्यंत पूर्णपणे बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून हा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनापुढे उभे राहिले आहे. लोकमान्यनगर-शास्त्रीनगर या प्रभाग क्रमांक ६ मध्ये करोना विषाणूचा संसर्ग वाढला होता.*श
हा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा संपूर्ण प्रभाग ३ मेपर्यंत पूर्णपणे बंद केला होता. तसेच महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनी या भागात तपासणी सुरू केली होती. या उपाययोजनांमुळे करोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने येथील टाळेबंदी काहीशी शिथिल करण्यात आली. त्यानुसार विठ्ठल मंदिर मैदानात तात्पुरत्या स्वरूपात फळ आणि भाजीपाला मंडई सुरू करण्यात येणार आहे.दूध डेअरी आणि अन्नधान्याची दुकाने सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
लोकमान्यनगर-शास्त्रीनगर या भागातील टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली असली तरी करोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने वागळे इस्टेट, कोपरी, विजयनगर हे परिसर पूर्णपणे बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोपरी, वागळे इस्टेटमधील सीपी तलाव तसेच अन्य परिसरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून त्यामुळेच महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या वृत्तास महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दुजोरा दिला असून येत्या १० मेपर्यंत हा परिसर बंदच ठेवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजयनगरमध्येही रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने हा परिसर १७ मे पर्यंत बंद ठेवला जाणार आहे. मात्र, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यामध्ये काही बदलही लागू केले जाऊ शकतात, असे पालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सांगितले.
दिवा, मुंब्य्रात नियम कायम
गेल्या काही दिवसांपासून दिवा आणि मुंब्रा भागात पहाटे ३ ते दुपारी १२ या वेळेत भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवली जात असून हाच नियम यापुढे कायम ठेवण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे, असे पालिका उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले. तसेच कळवा परिसरातही रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या ठिकाणीही संपूर्ण टाळेबंदी कायम ठेवण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम