वाडा तालुक्यातील रेशनिंग काळाबाजार प्रकरणी चौकशीचे आदेश

■ आदर्श महाराष्ट्रने प्रसिध्द केले होते वृत्त

पालघर (जयेश शेलार): पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात रेशनिंग धान्याचा  काळाबाजार होत असल्याची तक्रार डॉ.सिद्धार्थ सांबरे यांनी केली होती. याबाबतचे वृत्त दैनिक आदर्श महाराष्ट्रमध्ये प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वाडा तहसीलदार यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

            या संदर्भातील तक्रारीचे निवेदन डॉ. सांबरे यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना दिले होते. या निवेदनात वाडा तालुक्यातील मौजे - वसुरी बुद्रुक (घोडमाळ) येथील असलेले रेशनिंग दुकान येथे हा प्रकार उघडकीस आणल्याचे उदाहरण निवेदनात देऊन वाडा तालुक्यातील काही रेशन दुकान चालक हे अशाच प्रकारे अन्न धान्याचा अपहार करून काळा बाजार करतात आणि लाभार्थी रेशनिंग आणण्यासाठी गेले असताना त्यांना धान्याचा तुटवडा असल्याचे सांगून मंजूर धान्यापैकी किंवा वस्तूंपैकी फक्त ३० ते ५०% दिले जाते बहुधा दिले देखील जात नसल्याचे देखील निदर्शनास आणले होते.

            सदर रेशन दुकान चालक हे लाभार्थ्यांची तसेच शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतात हे यावरून दिसून येत असल्याचा आरोपही डॉ. सांबरे यांनी केला होता. तसेच रेशनिंग दुकान चालकाकडून रेशन कार्ड धारकांच्या नावावर धान्य परस्पर विकल्याची एंट्री करून लाभार्थ्यांची फसवणूक करून या धान्याचा अपहार करून परस्पर काळा बाजार होत असल्याचाही डॉ. सांबरे यांचा आरोप होता.

          याबाबतचे वृत्त दैनिक महाराष्ट्रने प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वाडा तहसीलदार यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान विशेष वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्याबद्दल डॉ. सांबरे यांनी आदर्श महाराष्ट्र वृत्तपत्राचे आभार मानले आहेत.

संबंधित पोस्ट