...तर लोक जगण्यासाठी खून करतील, दरोडे घालतील
- by Editor
- Apr 13, 2020
- 1060 views
कोरोनाला रोखण्यासाठी सतत लॉक डाऊन करणे हा काही पर्याय ठरू शकत नाही उलट अशा पर्यायामुळे आहेत ते उद्योग धंदे बंद पडतील, लोक बेरोजगार होतील आणि पोट भरण्यासाठी रस्त्यावर उतरून चोऱ्यामाऱ्या करतील, दरोडे घालतील, पैशासाठी एकमेकांचे मुडदे पाडतील. गुन्हेगारी एवढी वाढेल की कायदा व सुव्यवस्था राखणे सरकारला अवघड होऊन जाईल. महाराष्ट्राची तर इतकी वाईट अवस्था आहे की राज्यावर ६ लाख कोटींचे कर्ज आहे अशावेळी लॉक डाऊन करून महिना दोन महिने जर राज्यातले उद्योग धंदे बंद ठेवले तर सरकारला महसूल कुठून मिळणार आणि सरकारचा खर्च कसा भागणार? सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कुठून देणार? जे लोक आज लॉक डाऊनचे समर्थन करीत आहेत त्यांनी त्या गरीब लोकांचा विचार केला आहे का ? जे लोक छोट्या छोट्या उद्योगांमध्ये काम करतात अशा लोकांची संख्या कित्येक कोटींच्या घरात आहे महाराष्ट्रातील १२ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास ७ कोटी लोक हे गरीब आणि छोट्या उद्योगांमध्ये काम करणारे आहेत आणि हे छोटे उद्योगधंदे अगोदरच मंदी मुळे मेटाकुटीला आलेले आहेत अशा स्थितीत सरकारने सुरवातीला २१ दिवसांचा लॉक डाऊन केला आणि त्यानंतर आणखी १५ दिवस लॉक डाऊनची मुदत वाढवली त्यानंतरही परिस्थिती आटोक्यात आली नाही तर आणखी महिनाभर लॉक डाऊन वाढवाल अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे ज्यामध्ये राजकारणी, बडे सरकारी अधिकारी, टाटा, बिर्ला सारखे बडे उद्योगपती त्यांचे ठीक आहे त्यांच्यासाठी लॉक डाऊन वर्षभर राहिला तरी फरक पडणार नाही पण ज्याचे हातावर पोट आहे जे छोट्या कारखान्यांमध्ये काम करतात जे रिक्षावाले आहेत, जे टॅक्सी वाले आहेत जे रस्त्यावर भाजीपाला विकून पोट भरतात, जे माथाडी कामगार आहेत, जे बांधकाम व्यवसायातील मजूर आहेत त्यांचं काय? त्यांचा कोणी विचार केला आहे का ? पहिल्या २१ दिवसांच्या लॉक डाऊनची जर व्यवस्थित अमल बजावणी झाली असती तर दुसऱ्यांदा लॉक डाऊन करण्याची पाळी आली असती का? लॉक डाऊन करून जर देश लष्कराच्या ताब्यात दिला असता आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी मोठी यंत्रणा उभारून किमान गहू, तांदूळ, साखर , डाळ, गॅस येवढ्या जरी वस्तू लोकांपर्यंत पोहचल्या असत्या तर लोक घराबाहेर पडलेच नसते आणि कोरोनाचा फैलावही झाला नसता .२१ दिवसांचा लॉक डाऊन केल्यानंतर त्याची कुठेही कठोर अमलबजावणी होताना दिसली नाही . लॉक डाऊन असतानाही लोक बिनधास्त घराबाहेर पडत होते. भाजी मार्केट मध्ये गर्दी करीत होते. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानावर लोक प्रचंड गर्दी करीत होते आणि म्हणूनच कोरोना झपाट्याने पसरला .आता लोकांना कसला दोष देता. लोकांच्या मनात अशी भीती आहे की उद्या जीवनावश्यक वस्तू संपल्या दुकाने बंद झाली तर खायचं काय या भीतीपोटी लोक दुकानावर भाजी मार्केट मध्ये गर्दी करीत आहेत आणि त्यांना ज्या कठोर पद्धतीने रोखायला हवे तसं रोखल जात नाही त्यामुळे रस्त्यावरची मार्केटमधील गर्दी वाढतेय आणि वाढत्या गर्दी बरोबर कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढतेय. त्यामुळेच २१ दिवसांच्या लॉक डाऊनचा पूर्णपणे फज्जा उडाला. आता आणखी १५ दिवसांचा लॉक डाऊन करण्यात आला आहे निदान तो तरी बंदुकीच्या धाकावर अमलात आणावा ! लॉक डाऊन वाढविलेल्या या १५ दिवसांच्या काळात जीवनावश्यक वस्तू लोकांच्या घरापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी. लष्कर किंवा एसआरपी रस्त्यावर उतरवून शूट ऍट साईटची ऑर्डर द्यावी म्हणजे एकही माणूस रस्त्यावर दिसणार नाही आणि तशी व्यवस्था केली तरच ३० एप्रिल पर्यंत वाढवलेला लॉक डाऊन काही प्रमाणात यशस्वी होईल . मात्र पुन्हा पुन्हा लॉक डाऊन वाढवून देशाचा तुरुंग करण्याचा प्रयत्न केला तर देशाच्या अर्थव्यवस्थेची तर वाट लागेलच पण बेरोजगार झालेले लोक दोन वेळच अन्न मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून गुन्हेगार बनतील. लुटालुट सुरू होईल , माणूस माणसाचा शत्रू बनेल आणि देशातील संपूर्ण समाज व्यवस्था धोक्यात येईल तेंव्हा एक वेळ लॉक डाऊन ची मुदत वाढवली ठीक आहे मात्र हा लॉक डाऊन सक्तीचा असावा. खऱ्या कर्फ्यु प्रमाणे असावा आणि मुख्य म्हणजे या काळात कोरोनाची संख्या कमी झालेली असावी किंबहुना ती नियंत्रित करण्यात तरी यश आलेले असावे तरच लॉक डाऊनची मुदत वाढवल्याचा फायदा होईल.
देशात सध्या काय परिस्थिती आहे याची लोकांनाही कल्पना आहे. त्यामुळे लोक सरकारच्या पाठीशी आहेत मोदींनी सांगितले वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांच्या सन्मानार्थ टाळ्या आणि थाळ्या वाजवा, लोकांनी एकजुटीने ते काम केलं. मोदींनी सांगितले मेणबत्या पेटवा लोकांनी पेटवल्या याचा अर्थ लोक सरकारच ऐकत आहेत. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देत आहेत. पण काही गोष्टी अशा आहेत की माणसाच्या मनात एकदा का भीती निर्माण झाली की मग तो सर्वात प्रथम आपल्या सुरक्षेचा विचार करतो एक तर २१ दिवसांचा पहिला लॉक डाऊन जाहीर करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेण्यात आले नाही. लोकांना कोरोनाच्या दुष्परिणामांची पुरेशी कल्पना देण्यात आली नाही त्याच बरोबर लॉक डाऊनच्या काळात सरकार अत्यावश्यक् सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंबाबत काय काय करणार आहे याची पुरेशी माहिती देण्यात आली नाही त्यामुळे लोकांच्या मनात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्या बाबत भीती निर्माण होणे स्वाभाविक होते आणि म्हणून लोक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानावर गर्दी करीत होते यावेळी सरकारकडून लोकांना सांगितले जात होते की देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे पण प्रत्यक्षात मात्र किराणा मालाच्या दुकानात धान्याचा तुटवडा दिसत होता. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पुरेशा प्रमाणात आम्हाला धान्य मिळत नाही असे दुकानदारांचे म्हणणे होते असा सगळा संभ्रम आजही आहे म्हणून लोक दुकानावर गर्दी करीत आहेत तेंव्हा लॉक डाऊनच्या या दुसऱ्या टप्प्यात आता तरी सरकारने लोकांच्या मनातला संभ्रम दूर करावा आणि लॉक डाऊनच्या काळात लोकांनी बाहेर पडू नये असे वाटत असेल तर लोकांच्या घरापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोचवण्याची व्यवस्था करावी. देशातील काही राज्यांमध्ये अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे मग मुंबई किंवा महाराष्ट्रात तसे का नाही? मुख्यमंत्री म्हणतात मला कोरोनाची संख्या शून्यावर आणायची आहे पण ती कशी आणणार? सारखं सारखं लॉक डाऊन करून कोरोनाची संख्या शून्यावर येणार आहे का? तुम्ही लॉक डाऊन किती वेळा केलाय यापेक्षा लॉक डाऊन चीं अमलबजावणी किती कठोरपणे केली यावरच कोरोनाला नियंत्रित करणे किंवा कायमचे संपवणे अवलंबून आहे. तेंव्हा कोरोनाचा विचार करताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि गोरगरिबांच्या पोटापाण्याचा सरकारने विचार करावा कारण सारखा सारखा लॉक डाऊन महाराष्ट्रासारख्या कर्जबाजारी राज्याला परवडणारा नाही याने महाराष्ट्र आणखी खड्ड्यात जाईल याचे सरकारने भान ठेवावे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम