कोरोना महामारीचं जागतीक संकट, बँका आणि बेजबाबदार हेकेखोर ज्येष्ठ नागरीक
- by Adarsh Maharashtra
- Mar 24, 2020
- 888 views
ज्यावेळी संकट तुमच्या पायाशी येत नाही तोवर गाफील राहण्याची मानवी प्रवृत्ती घातकच असते. हे संकट केवळ तुमचा व्यक्तीगत घात करणारे असेल तर तुम्ही बेजबाबदार राहिला तरी इतरांचं काही बिघडत नाही. तुमच्या बेजबाबदारपणाची फळे तुम्ही एकटेच भोगणार असता. पण ज्यावेळी तुमचा बेजबाबदार आणि हेकट स्वभाव इतरांच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न करीत असेल, अवघ्या देशाला संकटात टाकण्यासाठी कारणीभूत ठरत असेल तर तुम्हाला अटकाव आणि मज्जाव केलाच पाहिजे. हे लिहिण्याचं कारण आणि निमित्त आहे बँका. मी मुळातला बँकर आहे आणि दहा ब्रँचेसला व्यवस्थापक म्हणून काम केलेले आहे. माझे सगळ्याच बँकेत अनेक मित्र आहेत, काही विद्यार्थी आहेत. मी सहज एका व्यवस्थापकाला फोन केला आणि काय परिस्थिती आहे अशी चौकशी केली. त्याच्या उत्तराने मी चक्रावलोच. तो सांगत होता की शाखेत आलेल्यातले जवळपास सगळे ज्येष्ठ नागरीक आहेत आणि जे काम आजच काय पण पुढचा महिनाभर केले नाही तरी चालेल असं काम घेऊन आले आहेत. मग मी आणखी काही शाखाव्यवस्थापकांकडे चौकशी केली तर तीच परिस्थिती सगळीकडे असल्याचं समजलं.
बँका अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु ठेवल्या आहेत. यातला अत्यावश्यक शब्दाचा अर्थ तरी विचारात घ्यावा. आजारी पडला आहात आणि औषध हवं आहे, ते अत्यावश्यक असतं. घरात खायला काही नाही म्हणून किराणा किंवा दूध अत्यावश्यक आहे. पण बँकिंग? जर बाजारपेठा पूर्ण बंद आहेत तर खरेदीसाठी पैशाची आवश्यकता नाही. जर तशीच गरज पडली तर सगळ्या बँकांची एटीएम आहेत. बिले भरण्यासाठी किंवा अन्य पैसे देण्यासाठी नेट बँकिंग आहे. तसं पाहिलं तर या डिजिटल युगात बँका अशा प्रसंगात अत्यावश्यक असतच नाहीत. त्यामुळे एक राष्ट्रीय जबाबदारी, मानवी जबाबदारी म्हणून तरी प्रत्येकाने शक्य तितका संपर्क टाळायला पाहिजे. पण अनेक जण कारण नसतानाही स्कूटर काढून चक्कर मारताना दिसतात. कुणी तरी सगळे नियम धाब्यावर बसवून आणि या परिस्थितीचा फायदा उठवत आपली चहाची टपरी सुरु ठेवतो आणि बेजबाबदार मंडळी तिथेही गर्दी करतात.
बँकांमधल्या ज्येष्ठ नागरीकांबाबत आता थोडं कठोर व्हायला लागणार आहे. सगळे वैद्यकीय तज्ञ, शासकीय अधिकारी कंठरवाने सांगत आहेत की साठीच्या पुढच्या ज्येष्ठांनी घराबाहेर पडू नये. यामागे त्यांचंच हित आहे. पासबुक भरण्यासाठी, चेकबुक मागण्यासाठी, व्याजदराची चौकशी करण्यासाठी किंवा अशाच किरकोळ कामासाठी ही मंडळी बँकेत कशाला येतात. तुमच्यामुळे एक तर या परिस्थितीचं ज्यांना ज्यांना गांभीर्य आहे त्यांना त्रास होतो, बँकेतला कर्मचारी हाही जीव धोक्यात घालून काम करत असतो त्याला कमीत कमी त्रास कसा होईल ही या ज्येष्ठांनीच विचार करण्याची गोष्ट आहे. वयाबरोबर एक जाणती परिपक्वता यायला पाहिजे. त्याऐवजी हेकेखोरपणा येणे म्हणजे अविकसित आणि बेजबाबदार व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. ज्या ज्येष्ठांनी आपला आदर्श तरुण पिढीपुढे घालून द्यायचा त्यांनीच बेजबाबदार वागायला सुरुवात केली तर आताची पिढी बिघडली आहे असा टाहो फोडण्यात काय अर्थ आहे. जे कुणी ज्येष्ठ असतील त्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि एक जबाबदार ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरीक म्हणून दाखवून द्यावे. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या मुलांनी त्यांना याची जाणीव करुन द्यावी, त्यांच्या बाहेर जाण्यावर बंधने घालावीत.
बँकेत टाळता येणारी आणखी एक गोष्ट आहे. ती म्हणजे रोखीचा भरणा. व्यापारी बंद आहेत. त्यामुळे रोख जमा होत नाही. ज्यांच्याकडे रोख शिल्लक आहे त्यांनी ती स्वत:जवळ सांभाळली तर काय हरकत आहे. रोखीच्या नोटांमधून संसर्ग लवकर पसरु शकतो. बँकांनी रोखीचा भरणा नावाची खिडकी बंद करुन टाकावी. अनेक सेवा बंद ठेवल्या तरी कुणाचं काही अडत नाही. बँका बंद ठेवण्याचा निर्णय नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यान्वये घ्यावा लागतो. तसा घ्यावा आणि बँकाही बंद ठेवाव्यात.
या सगळ्या गंभीर परिस्थितीत कुणी राजकारण करु नये. इतक्या बंधनांची काय आवश्यकता होती अशी टीकाटिपण्णीही नको. प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे, समाजाच्या आरोग्याचा आहे आणि देशाच्याही. मोजक्या बेजबाबदार माणसांमुळे जबाबदार माणसांच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न व्हायला नको असेल तर या बेजबाबदार मंडळींना आपणच आवरायला पाहिजे.
श्री. सुधाकर घोडेकर हे बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील सेवानिवृत्त अधिकारी असून त्यांनी आज करोना व्हायरसच्या काळात बॅंकेतील कर्मचारी ; अधिकारी वर्गाला जो काही त्रास सहन करावा लागतो आहे त्याला वाचा फोडण्याचा केलेला प्रयत्न !

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम