ठाण्यात प्रेमसंबंधातून तरुणीची आत्महत्या

आत्महत्येनंतर तिच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी पोलिसांना आढळून आली नाही

ठाणे (प्रतिनिधी): पाचपाखाडी येथील टेकडी बंगला भागात प्रेमसंबंधातून एका तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. सोनिया राणे (२०) असे या तरुणीचे नाव असून, तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोनिया हिचे एका २७ वर्षीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. सोनियाला या तरुणाने लग्नास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पाचपाखाडी येथील टेकडी बंगला भागात सोनिया वास्तव्यास होती. गुरुवारी सकाळी ती याच परिसरात राहणाऱ्या आपल्या आत्याच्या घरी गेली. त्यावेळी घरात तिची आत्येबहीण होती. सोनिया घरातील शयनगृहात (बेडरूम) गेली आणि तिने दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनिया बाहेर येत नसल्याने तिच्या आत्येबहिणीने वडिलांना बोलावून घेतले. त्यानंतर घराचा दरवाजा उघडल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

या घटनेनंतर नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येनंतर तिच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी पोलिसांना आढळून आली नाही. मात्र, सोनियाचे एका २७ वर्षीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्या तरुणाने लग्नाला नकार दिला आणि यातून तिने आत्महत्या केली असावी असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नौपाडा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट