गॅसगळतीमुळे हॉटेलमध्ये स्फोट

मॅक्सेस मॉलसमोर इटालीयोज हे नवे हॉटेल उभे राहिले आहे.


भाईंदर (प्रतिनिधी) : भाईंदर पश्चिम परिसरातील मॅक्सस मॉलसमोरील इटालीयोज हॉटेलमध्ये बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की परिसरातील इतर दुकानांचे, वाहनांचे नुकसान झाले. इमारतीतील खिडकीच्या काचा फुटून नुकसान झाले. स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने बॉम्बशोधक पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

मॅक्सेस मॉलसमोर इटालीयोज हे नवे हॉटेल उभे राहिले आहे. गॅस गळतीमुळे या हॉटेलमध्ये रात्री १२.३० वाजता स्फोट झाला. या स्फोटामुळे जीवितहानी झाली नसली तरी एक श्वान गंभीर जखमी झाला आहे. स्फोटामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या आणि त्या इतस्त: पसरल्या. रात्री फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या नागरिकांना काचा लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी येथे लागलेली आग आटोक्यात आणली.  हॉटेलमध्ये उष्णता बाहेर टाकण्यासाठी आवश्यक असलेली चिमणी नसल्यामुळे स्फोट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या स्फोटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सर्व हॉटेल-उपाहारगृहांची तपासणी करून सुरक्षेची साधने आहे की नाही हे तपासावे, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते डॉ. असिफ शेख यांनी केली.

हॉटेलच्या आतमध्ये गेल्यावर गॅसगळती सुरू असल्याचे आढळले. स्पार्क होऊन स्फोट झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. – सदानंद पाटील, अग्निशमन  अधिकारी, मीरा-भाईंदर

रहदारी असलेल्या भागात हे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून प्रशासने गंभीर दखल घेण्याची गरज आहे. डिंपल मेहता, महापौर

प्राथमिक तपासात गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचे आढळून येत आहे. परंतु स्फोटाची तीव्रता बघता आम्ही  गंभीर दखल घेऊन एटीएस, एसआईडी आणि बीडीडीएस यांनी तपासणी करण्याची मागणी केली आहेसंजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक (ठाणे ग्रामीण)

संबंधित पोस्ट