महाराष्ट्रात गुटखा बंदी कागदावरच? भिवंडीत मोठी कारवाई, सुमारे 3 कोटींचा गुटखा जप्त
महाराष्ट्र सरकारने गुटखा बंदी लागू केली असली तरी अद्यापही गुटखा विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण आणता आलेले नाही
- by Reporter
- Jan 17, 2020
- 868 views
भिवंडी(प्रतिनिधी): महाराष्ट्र सरकारने गुटखा बंदी लागू केली असली तरी अद्यापही गुटखा विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण आणता आलेले नाही. मुंबईबरोबरच राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही सर्रास गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करीत भिवंडी तालुक्यातील खारबाव ग्रामपंचायत हद्दीतील एका गोदामात साठवणूक करून ठेवलेला तब्बल 2 कोटी 75 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. भिवंडी कामण वसई रस्त्यावरील खारबाव ग्रामपंचायत हद्दीतील आडवाटेच्या रस्त्यावरील गोदामात गुटखा साठविला जात असल्याची माहिती ठाण्यातील अन्न निरीक्षक माणिक जाधव व शंकर राठोड यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त ( अन्न )एस एस देसाई, सहाय्यक आयुक्त डॉ भूषण मोरे, वाघमारे पी एम, डी बी भोगावडे यांच्या नेतृत्वाखालील अन्न निरीक्षक माणिक जाधव, शंकर राठोड, एस एम वरजकर ,एम एम सानप, अरविंद खडके, के पी जाधव, व्ही एच चव्हाण या पथकाने खारबाव येथील श्री गणेश मंगल कार्यालया शेजारील नारायण हल्या काठे यांच्या गोदामावर छापा मारला. त्या ठिकाणी शिखर, बाजीराव, दुबई, राजनिवास यांसह इतर नावे असलेल्या गुटख्याच्या तब्बल 432 गोणी आढळून आल्या. त्या मालाची एकूण किंमत 2 कोटी 74 लाख 52 हजार 700 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात येथे गुटखा विक्री होत असल्याने गुटखा माफियांचे जाळे वाढत असल्याचे दिसते. ही परिस्थिती चिंताजनक असून महाराष्ट्राला गुटखा मुक्त करण्यासाठी प्रथम अशा माफियांचा शोध घेणं गरजेचं ठरलं आहे.
रिपोर्टर