
कोल्हापुरात तान्हाजी चित्रपटाचं रांगडं स्वागत, तर बेळगावात संघर्ष
बेळगावात मराठी - कन्नड भाषिकांत संघर्ष
- by Reporter
- Jan 11, 2020
- 1180 views
कोल्हापू (प्रतिनिधी): मराठेशाहीच्या इतिहासात शौर्यगाथा गाजविणारे तान्हाजी मालुसरे यांच्या शूर कथेवर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत झाले. तर, बेळगावात मात्र कन्नड भाषिकांनी या चित्रपटाला जोरदार विरोध केला. त्यांनी चित्रपटाचे पोस्टर सिनेमागृहावरुन काढून टाकत आपला विरोध दर्शवला. तसेच चित्रपट बंद करण्याच्या घोषणा देखील दिल्या. परंतु या प्रकाराला मराठी भाषिकांनी तोडीस तोड उत्तर दिले. त्यांनी चित्रपटाचा नवा फलक पुन्हा एकदा सिनेमागृहावर लावून प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याची संधी उपलब्ध करुन दिली
अभिनेता अजय देवगण या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांची मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. हा अजयच्या सिनेकारकिर्दीतील १०० वा चित्रपट आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच चित्रपटगृहाबाहेर लावलेल्या भव्य फलकावरील तान्हाजी मालुसरे यांच्या प्रतिमेस मोठा हार घालून अभिवादन केले. यावेळी या चाहत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व तान्हाजी मालुसरे यांचा जयघोष केला.
बेळगावात मराठी – कन्नड भाषिकांत संघर्ष
बेळगाव येथे तान्हाजी चित्रपट प्रदर्शित होत असताना कन्नड भाषिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्लोब चित्रमंदिर येथे जाऊन पोस्टर काढून टाकले. चित्रपट बंद करण्याच्या घोषणा दिल्या. चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांवर दादागिरी केली. कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, धारवाड, दावणगिरी येथे चित्रपटाचे प्रदर्शन बंद करण्याचा प्रयत्न करुन मराठी द्वेषाचे दर्शन घडवले.
बेळगावातील मराठी भाषिकांनी मात्र या चित्रपटाचे उत्साहाने स्वागत केले. त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. तसेच त्यांनी कन्नड संघटनेच्या दादागिरीचा निषेध देखील नोंदवला. तान्हाजी चित्रपटाच्या निमित्ताने बेळगाव सीमाभागात पुन्हा एकदा मराठी भाषिक विरुद्ध कन्नड भाषिकांमधील संघर्ष पाहायला मिळाला
रिपोर्टर