ठाण्यात पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून दररोज सकाळ - संध्याकाळी लाखोंच्या संख्येने नागरिकांचा वावर असतो.
- by Sanjay Pachouriya
- Jan 03, 2020
- 695 views
ठाणे (प्रतिनिधी): ठाणे स्थानक परिसरात तसेच शहरातील काही अंतर्गत मार्गावर फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेने या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. ही मोहीम पुन्हा थंडावली आहे. काही भागात फेरीवाल्यांमुळे वाहतूककोंडीत देखील भर पडत आहे.
रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाले बसू शकत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा वावर अजूनही पाहायला मिळतो. या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेने विशेष मोहीम राबवली होती. ही मोहीम पुन्हा थंड पडल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर फेरीवाले बस्तान मांडून बसतात. तसेच त्या ठिकाणी रिक्षाचालकांचा देखील बेशिस्त पद्धतीने वावर असतो.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून दररोज सकाळ – संध्याकाळी लाखोंच्या संख्येने नागरिकांचा वावर असतो. त्यामुळे प्रवाशांना तेथून चालण्यास अडथळा निर्माण होत आहे. रेल्वे स्थानक परिसराला लिंबू सरबत, मोबाइल कव्हर, चणे-शेंगदाणे तसेच फळ विक्रेत्यांनी विळखा घातलेला पाहायला मिळतो. रेल्वे स्थानकाबरोबरच गावदेवी तसेच जांभळी नाका परिसरात देखील फेरीवाले मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतात. गावदेवी परिसरात सायंकाळच्या वेळी फेरीवाल्यांचा वावर वाढतो. यामध्ये कपडे, सौंदर्यप्रसाधन वस्तू, दागिने, विक्रेते अशा विविध वस्तू विक्रेत्यांचा समावेश असतो. सायंकाळच्या वेळी या परिसरात नागरिकांची मोठय़ा संख्येने रहदारी असते. या मार्गावरील पदपथ फेरीवाल्यांनी अडवल्यामुळे नागरिकांना चालण्यास अडथळा येत आहे. जांभळी नाका बाजारपेठ रस्त्याकडेला देखील फेरीवाले मोठय़ा संख्येने बसलेले पाहायला मिळत आहेत. स्थानक परिसरापासून ते जांभळी नाकापर्यंत बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी रहदारी असते, या ठिकाणी दुकानांची संख्या जास्त असल्यामुळे ग्राहकांची जास्त गर्दी असते. या परिसरात ठाणे महापालिकेचे ना फेरीवाला क्षेत्र असे फलक जागोजागी असून देखील या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसलेले पाहायला मिळतात. त्यामुळे या मार्गावर सायंकाळच्यावेळी वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. यासंबंधित ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता या फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम