मुंबई हादरली! मुक्या आई-वडिलांचं 6 महिन्याचं लेकरू शेजाऱ्यांनी परस्पर विकलं

मुक्या दांपत्याच्या 6 महिन्यांच्या बाळाला खेळण्याच्या बहाण्याने नेऊन त्याची परस्पर विक्री केल्याची घटना फातमानगर इथे रविवारी दुपारी घडली आहे. अरमान इस्तियाक अंसारी ( 6 महिने ) असे अपहरण झालेल्या बाळाचे नांव आहे.

भिवंडी (प्रतिनिधी): भिवंडीमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुक्या दांपत्याच्या 6 महिन्यांच्या बाळाला खेळण्याच्या बहाण्याने नेऊन त्याची परस्पर विक्री केल्याची घटना फातमानगर इथे रविवारी दुपारी घडली आहे. अरमान इस्तियाक ( 6 महिने ) असे अपहरण झालेल्या बाळाचे नांव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर मुलाची आई अस्मा ( 30 ) आणि वडिल इस्तियाक (35) हे दोघेही मुके आहेत. त्याचा फायदा घेत शेजारी राहणारी महिला फरीदा अंसारी ( 40) व तिचा मुलगा रज्जन (बदलेलं नाव) ( 17) यांनी मुलाला खेळवण्याच्या बहाण्याने कोठेतरी नेऊन त्याची विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या माय-लेकाने या मुलाला गायब करण्याच्या हेतूने सुरुवातीला 5 डिसेंबर रोजी घरातून नेऊन त्याला 6 डिसेंबर रोजी घरी आणलं. त्यानंतर पुन्हा 6 डिसेंबर रोजी सायंकाळी त्याला घरातून नेऊन 16 डिसेंबर रोजी घरी आणले. मात्र, पुन्हा 16 डिसेंबर रोजी नेऊन 21 डिसेंबरला त्याला आणले होते. मात्र, पुन्हा त्यास 22 डिसेंबर रोजी दुपारी खेळण्याच्या बहाण्याने घरातून नेऊन गायब केलं आहे. बाळ गायब असल्याच्या घटनेची खबर इस्तियाक याचा भाऊ इलियास अंसारी यास समजली. त्याने याबाबत अधिक चौकशी केली असता शेजारची महिला फरीदा आणि तिचा मुलगा रज्जन या माय-लेकाने संगनमताने बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने कोठेतरी नेवून ठेवले आहे.

यावर त्यांच्याकडे मुलाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हतबल झालेल्या इलियास याने शांतीनगर पोलीस ठाणे गाठून फरीदा व तिचा मुलगा रज्जन या दोघांच्या विरोधात भादंवि कलम 363, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिराने पोलीस निरीक्षक (गुन्हे ) नितीन पाटील यांनी संशयीत अपहरणकर्ती फरीदा अंसारी हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून मुलाचा कसून शोध सुरू केला आहे.



रिपोर्टर

संबंधित पोस्ट