कोकणात समझोता एक्स्प्रेस
राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू नसतो. कधीकधी सत्तेसाठी पूर्व वैमनस्य विसरून प्रवाह ज्या दिशेने आहे त्या दिशेने जावे लागते. अशावेळी जर काही मिळवायचे असेल किंवा राजकारणात टिकून राहायचे असेल तर 'मी' पणा बाजूला ठेवून एखाद्याशी जुळवून घ्यावे लागते. नारायण राणेंना उशिरा का होईना याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपले कट्टर विरोधक असलेल्या शिवसेने समोर मैत्रीचा हात पुढे करण्याची तयारी दर्शवली आहे. कोकणातील शांतता आणि विकासाच्या दृष्टीने ही एक गुड न्यूजच म्हणावी लागेल. कारण राणे शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये गेल्यापासून कोकणात जो राणे आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू झाला होता त्याने कोकणी माणूस भयभीत होता. अशा स्थितीत आता जर राणे आणि शिवसेना झाले गेले विसरून युतीचा धर्म पाळणार असतील आणि कोकणच्या भल्यासाठी शिवसेना-भाजप एकत्रपणे काम करणार असतील तर कोकणचे भलेच होईल. तसे पाहता राणेंचा शिवसेना सोडण्याचा निर्णय काहीसा अविचारी होता. याचे कारण आज कोकणात सेनेची बऱ्यापैकी ताकद आहे तर दुसरीकडे राणे काँग्रेस मध्ये गेले पण तिथे त्यांना सेनेच्या विरोधात काँग्रेसला सक्षम करता आले नाही. उलट काँग्रेस मध्ये राहून राणेंचेच वजन घटले. आणि ज्या कोकणात त्यांचा दरारा होता त्याच कोकणातील कुडाळ या त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचा सेनेच्या उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंचाही पराभव झाला. काँग्रेसने राणेंना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते पण त्यासाठी राणेंनी कोकणात आणि संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद निर्माण करायला हवी होती पण ते राणेंना जमले नाही. उलट महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशीच त्यांचे खटके उडू लागले. राणेंबद्दलच्या तक्रारी वाढू लागताच काँग्रेस नेतृत्वानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे अखेर त्यांना काँग्रेस सोडावी लागली. सत्तेत राहिलेला माणूस सत्ते शिवाय राहू शकत नाही. त्यामुळे राणेंची घालमेल सुरू झाली होती आणि त्यातूनच त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळे भाजपला इच्छा असूनही ते राणेंना पक्षात घेऊ शकत नव्हते. पण त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली. कारण शिवसेनेच्या विरोधात भाजपला राणे सारखा आक्रमक नेता हवा होता. म्हणून त्यांनी राणेंना वेटिंगवर ठेवून त्यांच्या मुलाला पक्षात घेऊन कणकवली मतदार संघातून उमेदवारी दिली. वास्तविक सेनेची जरी नितेश राणेंच्या प्रचारात सहभागी होण्याची इच्छा नसली तरी त्यांनी युतीचा धर्म पाळून शांत बसायला हवे होते. पण राणेंवर सेना नेत्यांचा इतका राग आहे की त्यांनी युती असतानाही कणकवली मधून आपला उमेदवार उतरवला. इतकेच नव्हे तर राणेंचे पारंपरिक शत्रू असलेले संदेश पारकर यांना नितेश राणेविरुद्ध बंडखोरी करायला लावली. अर्थात नंतर पारकरने आपला अर्ज मागे घेतला पण ते भाजपचे कार्यकर्ते असूनही त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा दिला. त्यामुळेच शिवसेना आपल्या विरोधात काहीही करू शकते याची राणेंना प्रचिती आली. आणि म्हणूनच राणेंनी शिवसेनेसमोर मैत्रीचा हात पुढे केला. मात्र ही मैत्रीची प्रक्रिया एकतर्फी असता नये अशी त्यांनी अट घातली जी शिवसेना कधीच पूर्ण करणार नाही. त्यामुळे राणे आणि शिवसेनेत समझोता होईल असे सध्या तरी वाटत नाही. त्यातच राणे बंधूंची सेनेविरुद्धची बडबड सुरूच आहे. टाळी कधीच एक हाताने वाजत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या मनाचा अंदाज घेतल्याशिवाय राणेंनी मैत्रीचा हात पुढे करायला नको होता. पण राणेंना भाजप प्रवेशाची आणि आपल्या मुलाला कणकवली मधून निवडून आणण्याची घाई झाली आहे. त्यामुळेच ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून शिवसेनेशी हातमिळवणी करीत आहेत. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते यांच्याकडून अजून तरी याबाबत कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी राणे आणि शिवसेनेत मांडवली होईल असे वाटत नाही. अहो जिथे सेना भाजपाची २३ वर्षांची मैत्री असून त्यांची मनापासून युती होऊ शकली नाही तिथे राणेंचे काय? मात्र तरीही कोकणातील शांततेसाठी राणे आणि शिवसेना यांच्यात समेट होणे गरजेचे आहे.
असे कोकणी माणसाला वाटते. कारण काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शेकाप कडून कोकणी माणसाला कसलीही अपेक्षा नाही. पण शिवसेना आणि राणेंकडून अपेक्षा आहेत आणि म्हणूनच त्यांच्यातील वाद मिटणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी जर याबाबत पुढाकार घेतलेला असेल तर कोकणी जनता त्यांच्या या प्रयत्नांचे स्वागतच करेल. सेनेनेही आता जास्त ताणून धरू नये कारण राणे किती जरी मोठे बाहुबली असले तरी त्यांना आवर घालण्याची आणि ऐकले नाही तर कायमचे संपवण्याची ताकद भाजपात आहे. आणि शेवटी ईडी, सीबीआय आणि आयकर खाते आहेच ना सरकारच्या दिमतीला! जर राणेंनी मुख्यमंत्र्यांचे ऐकले तर भाजपला त्यांची गोडी, नाही तर आहेच ईडीची बेडी.
असे कोकणी माणसाला वाटते. कारण काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शेकाप कडून कोकणी माणसाला कसलीही अपेक्षा नाही. पण शिवसेना आणि राणेंकडून अपेक्षा आहेत आणि म्हणूनच त्यांच्यातील वाद मिटणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी जर याबाबत पुढाकार घेतलेला असेल तर कोकणी जनता त्यांच्या या प्रयत्नांचे स्वागतच करेल. सेनेनेही आता जास्त ताणून धरू नये कारण राणे किती जरी मोठे बाहुबली असले तरी त्यांना आवर घालण्याची आणि ऐकले नाही तर कायमचे संपवण्याची ताकद भाजपात आहे. आणि शेवटी ईडी, सीबीआय आणि आयकर खाते आहेच ना सरकारच्या दिमतीला! जर राणेंनी मुख्यमंत्र्यांचे ऐकले तर भाजपला त्यांची गोडी, नाही तर आहेच ईडीची बेडी.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम