वाढवा उत्सवाची शान!
विद्या आणि बुद्धीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशाचे तसे प्रत्येक शुभ कार्यात पूजन केले जाते कारण जीवनातील प्रत्येक टप्पा हा सुखकर आणि मंगलमय व्हावा यासाठी गणेशाचा आशीर्वाद असावा अशी हिंदू धर्मातील बहुतेकांची आस्था आहे आणि याच आस्थेपोटी भाद्रपदातील चतुर्थीला घराघरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र गणेश चतुर्थीचे महत्व ओळखून लोकमान्य टिळकांनी १८९३ साली गणेश चतुर्थीला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक शहरांमध्ये गणेशोत्सव मंडळ तयार झाली आणि मुंबईच्या गिरगावातून सुरू झालेला हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा महिमा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला. टिळकांचा या सार्वजनिक गणेशोत्सवामागे एकच उद्देश होता तो म्हणजे या उत्सवाच्या निमित्ताने सर्व देशबांधवांना एकत्र गोळा करणे आणि त्यांच्यात स्वातंत्र्य संग्रामची मशाल पेटवणे. टिळकांचा तो उद्देश सफल ही झाला. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या उत्सवाचे हळाळू स्वरूप बदलू लागले आणि आता तर गणेशोत्सव पूर्णपणे व्यावसायिक झाला आहे . अर्थात गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपा नंतरही गणेश भक्तांची आपल्या बाप्पावरची श्रद्धा काही किंचितही कमी झालेली नाही. लालबागच्या राजाच्या दर्शनाला लागणाऱ्या चार चार किमी च्या रांगा हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. तर पुण्यातही दगडूशेठ हलवाईसह इतर मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी लोकांची प्रचंड गर्दी उलटत असते. मात्र हा उत्सव साजरा करताना जी शिस्त, जी शांतता पाळायची असते ती मात्र कुठेच दिसत नाही. त्याच बरोबर अशा उत्सवाच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन व्हायला हवे ते कुठे फारसे दिसत नाही. उलट नको त्या गोष्टींवर उधळपट्टी केली जाते. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्या मागचा लोकजागृतीचा टिळकांचा जो उद्देश होता त्या उद्देशालाच आजच्या उत्सव मंडळांनी तडा दिल्या सारखे वाटतेय. टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तेंव्हा स्वातंत्र्य युद्धासाठी लोकजागृतीचा आवश्यकता होती. आज समाजातील अनिष्ट प्रथा भ्रष्टाचार बेरोजगारी महिलांची सुरक्षा अंधश्रद्धा आणि धर्माच्या नावाखाली समाजामध्ये फूट पडण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याविरुद्ध समाजाला जागृत करण्याची आवश्यकता आहे .त्यासाठी ११ दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवाच्या माध्यमातून जर वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे जर आजच्या समस्यांबाबत लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचा हेतू सफल होऊ शकतो. आणि उत्सवा दरम्यान कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत सत्कारणी लागू शकते. त्याच बरोबर उत्सव काळात वेगवेगळ्या पक्षातील पुढाऱ्यांची उत्सवमंडळाच्या ठिकाणची भाऊगर्दी आणि त्याचा दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना होणारा त्रास यामुळे लोक हैराण होतात. त्यामुळे दर्शनासाठी येणारे जे कोणी पुढारी असतील त्यांनी रांगेतूनच दर्शन घ्यायला हवे असा आग्रह उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धरायला हवा. कारण देवाच्या दरबारात रांगेतून दर्शन घेणार सामान्य गणेशभक्त आणि बड्या सेलिब्रेटीज यांच्यात दर्शनासाठी जेंव्हा भेदभाव केला जातो तेंव्हा मुलाबाळांना घेऊन तासंतास रांगेत उभ्या असलेल्या सामान्य गणेशभक्तांच्या भावना दुखावतात. त्याला वाईट वाटते. त्यामुळे हा भेदभाव कुठेतरी थांबायला हवा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्सव काळातील सुरक्षा! मुंबईच्या गिरगाव,भायखळा,काळाचौकी लालबाग,परळ,भोईवडा,दादर,या भागात सर्वाधिक सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होतात. त्यामुळे या भागांवर दहशतवादी संघटनांची सुरवातीपासूनच नजर आहे. पण प्रचंड सुरक्षा व्यवस्थेमुळे निदान अजून तरी कोणतीही मोठी घातपाताची घटना घडलेली नाही. पण यावेळी जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द केल्याने पाकिस्तानचा जळफळाट झालाय. पाकिस्तानकडून युद्धाची भाषा केली जातेय. पण आजवरचा इतिहास पाहता भारताबरोबर उघड्या मैदानात युद्ध करणे पाकला तिन्ही युद्धात परवडले नाही. त्यांना सपाटून मार खावा लागला होता. म्हणूनच सार्वजनिक उत्सवांमध्ये दहशतवादी घुसवून घातपात करण्याचा यावेळी प्रयत्न केला जाऊ शकतो म्हणूनच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आमचे पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा तर सतर्क आहेच पण गणेश भक्तांनीही सावधगिरी बाळगायला हवी. भले गर्दी कितीही असो, कान आणि डोळ्यांनी गर्दीतली कोणतीही संशयास्पद हालचाल टिपायला हवी तरच सुरक्षित दर्शन घेता येईल. कारण श्रद्धे इतकीच सुरक्षाही महत्वाची असते. उत्सव काळातील गर्दीत चोर आणि चमडी चोर यांचाही सुळसुळाट असतो. पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सगळ्याच गोष्टींवर लक्ष ठेवणे शक्य नसते. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेची स्वतःही काळजी घ्यायला हवी. अशातर्हेनें आपल्याला व आपल्या कुटुंबियांना सुरक्षितपणे या उत्सवाचा आनंद आणि गणरायाचे दर्शन घेता आले तरच या उत्सवाची शान वाढेल.
यंदा महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झाली त्यात सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसून तब्बल ६ लाख लोक विस्थापित झालेत तर ४५ लोकांचा मृत्यू झाला. शिवाय गुरेढोरे गेली ते वेगळेच. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधव दुःखी आहे आणि तो दुःखी असताना मुंबई पुण्या सारख्या शहरी भागातील नागरिकांनी धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करणे माणुसकीला धरून चालणारे नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या गोष्टीचे भान ठेवून उत्सवात मोठा गाजावाजा करू नये. ध्वनिक्षेपक आणि डीजेचा कर्णकर्कशपणा दुखीतांच्या जखमांवर मीठ चोळणार ठरू शकतो. कारण लालबाग,परळ,करिरोड,भायखळा या भागात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली,सातारा,कोल्हापूरचे,लोक मोठ्या संख्येने राहतात. महापुरात त्यांच्याही कुटुंबातील कुणी गेला असावा किंवा त्यांचे नातेवाईक बेघर झाले असतील त्यामुळे ते दुःखी आहेत. त्यांचे दुःख समजून घ्या आणि उत्सव काळातील नाचगाणे आणि मनोरंजनाचा धुमधडाका टाळा. तो पैसा पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या आणि शांततेत उत्सव साजरा करा.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम