दिशाहीन काँग्रेस
- by रघुनाथ किसन ढेकळे
- May 29, 2019
- 939 views
राष्ट्रीय पक्ष म्हटला की त्याला जनाधार असावा लागतो .पण त्यासाठी परिपक्व नेतृत्व आणि पक्षाची प्रत्येक राज्यात संघटनात्मक ताकद असावी लागते .दुर्दैवाने आज काँग्रेसकडे या दोन्ही गोष्टी नसल्याने काँग्रेसची वाताहत झाली आहे. अन्यथा स्वातंत्र्य संग्रामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसची प्रादेशिक पक्षांपेक्षाही वाईट अवस्था झाली नसती आणि आता या अवस्थेतून काँग्रेसला बाहेर काढणे वाटते तितके सोपे नाही. आज जे जुने बुजुर्ग आणि निष्ठावान काँग्रेसी आहेत त्यांना गांधी नेहरूंच्या काळातला काँग्रेसचा सुवर्णकाळ आठवत असेल . पण आता त्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता धूसर झालीय.कारण काँग्रेसने २०१४ आणि २०१९ साली झालेल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकी मध्ये जनतेचा विश्वास आणि जनाधारही गमावला आहे. त्यामुळे येणार काळ काँग्रेससाठी खूपच कठीण आहे. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो हे ठाऊक असतानाही काँग्रेस नेतृत्वाने कधी युपीकडे गांभीर्याने पाहिले नाही .त्याचा परिणाम असा झाला की गांधी कुटुंबाची पारंपरिक जागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युपीतील अमेठी मतदार संघातही काँग्रेसचा पराभव झाला .कधीकाळी यूपीतील ९० टक्के जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने मोठ्या आशेने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रियंकाला उतरवले. प्रियांकाने प्रचारही जोरदार केला पण लोकांनी तिलाही नाकारले. प्रियांकाने प्रचार करूनही ६३ मतदार संघात काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. याचा अर्थ लोकांनाही प्रियांकाने नेतृत्व मान्य नाही. आता या पराभवानंतर राजीनामा नाट्य सुरू झाले आहे. स्वतः राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला होता पण राजीनामा हे काही पराभवावर सोल्युशन नाही. उलट जनतेने दोन्ही निवडणुकीत आपल्याला का नाकारले याची कारणे शोधून झालेल्या चुका सुधारायला हव्यात .५ महिन्यांपूर्वी ज्या मध्य प्रदेश,राजस्थान,आणि छत्तीसगढ मध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करून तिथली भाजपची सत्ता उलथवून टाकली होती. त्या राज्यांमध्ये ५ महिन्यात असे काय घडले की काँग्रेसचा दारुण पराभव झाला .काँग्रेसने गांभीर्याने याची कारणे शोधायला हवीत. मात्र आता पर्यंत जी माहिती मिळालीय त्यानुसार मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये तिथल्या काँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी तिकीट वाटपात मनमानी केली. आपले नातेवाईक आणि जवळच्या लोकांनाच निवडणुकीचे तिकीट दिले आणि त्यांच्यासाठीच प्रचार केला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यानो पक्षाच्या प्रचारासाठी ज्या १३० प्रचारसभा घेतल्या. त्यातील ९३ आपल्या मुलाच्या प्रचारासाठी होत्या .एवढे करूनही गेहलोत आपल्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. राजस्थानात काँग्रेसची सत्ता असूनही काँग्रेसचा दारुण पराभव झाला मध्य प्रदेशातही मुख्यमंत्री कमलनाथ यांनी तेच केले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या याच मनमानीला काँग्रेस कार्यकर्ते वैतागले आणि त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली . निवडणुकीत कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद असते पण नेत्यांच्या मनमानीमुळे ही ताकदच कमजोर झाली . याउलट भाजपची संघटनात्मक ताकद मजबूत होती. त्याला संघाच्या स्वयंसेवकांची साथ मिळाली .एकीकडे मोदींचा झंझावात तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळे भाजपला यश मिळाले .राहुल गांधी मात्र राफेल मधेच अडकून पडले पण त्यांना हे ठाऊक नव्हते की देशातील ६० टक्के जनता ही खेडेगावात राहते. त्यांना राफेल काय तेच ठाऊक नव्हते. त्यामुळे राहुलने राफेल बाबत केलेला प्रचार लोकांच्या डोक्यावरून गेला .राहुल गांधींच्या अपरिपक्व नेतृत्वचा हा पुरावाच म्हणावा लागेल .निवडणूक प्रचारात लोकांच्या दैनंदिनी जीवनाशी संबंधित बाबींवरच प्रचारात भर द्यायला हवा. ज्यात महागाई,जातीयवाद,बेरोजगारी यासारखे मुद्दे असायला हवे होते. पण काँग्रेसच्या प्रचारात हे मुद्दे विस्तृतपणे लोकांसमोर मांडण्यात आलेले नाहीत. १५ लाख खात्यात टाकण्याबाबत मोदींनी लोकांना कसे फसवले. या एकाच मुद्द्यावर जरी प्रचारात जोर दिला असता तरी खूप फरक पडला असता. पण काँग्रेसच्या प्रचाराची दिशाच भरकटली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दलित मुस्लिम या आपल्या पारंपारिक मतदाराला एकसंघ ठेवण्यात आणि त्यांचा विश्वास जिंकण्यात काँग्रेसला अपयश आले म्हणून लोकांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली. आता या पराभवातून धडा घेऊन काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी तरी यापुढे प्रयत्न करावेत.
रिपोर्टर
संपादक - दैनिक आदर्श महाराष्ट्र
आदर्श महाराष्ट्र वेब टीम