स्वाभिमान पाठपुराव्यामुळे वाडा तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात

पालघर (जयेश शेलार) : स्वाभिमान संघटनेच्या पाठपुराव्यामुळे वाडा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेल्या कुडूस-देवघर, वाडा-भिवंडी मुख्य रस्ता, कुडूस कोंढले, सापरोंडे फाटा उचाट व डाकिवलीफाटा-केलठण या रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याचे दिसून येत असून या रस्त्यांची

दुरुस्ती व्हावी, यासाठी स्वाभिमान संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत होता. तर या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
             
स्वाभिमान संघटनेने दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याची दखल घेऊन वाडा तहसीलदार यांच्या दालनात सोमवारी (१४ सप्टेंबर) बैठक पार पडली असून या बैठकीत कुडूस-देवघर रस्त्याच्या कॉंक्रीटकरणाला सुरवात केली आहे, वाडा-भिवंडी मुख्य रस्ता खड्डे बुजवायला सुरवात झाली आहे, तसेच पाऊस थांबताच दोन दिवसात डांबरी करणाचे काम चालु होईल, कुडूस कोंढले रस्ता दुरुस्ती सुरू, सापरोंडे फाटा उचाट दुरुस्ती सुरू तसेच  डाकिवली फाटा - केलठण रस्ता दुरुस्ती सुरू झाल्याचे लेखी पत्र वाडा तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित केल्याचे स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष रवींद्र मेने यांनी सांगितले.
            
दरम्यान या बैठकीसाठी वाडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्वाभिमान संघटनेचे स्वप्नील जाधव, वसीम जळगावकर, कयेश पटेल, स्वप्नील पाटील  उपस्थित होते.

संबंधित पोस्ट