सोनिया गांधींविरोधात सरकारचे षडयंत्र; शरद पवार यांनी केली पाठराखण
- by Adarsh Maharashtra
- Dec 30, 2018
- 959 views
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणात युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांना गोवण्याचा षडयंत्र सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक पंतप्रधान आले पण आजपर्यंत विरोधकांना संकटात आणण्यासाठी व नामशेष करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणारा पंतप्रधान पाहिला नाही, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला. मंदिर, मशिदवर चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आधुनिकता व विज्ञान नव्या पिढीत रुजवण्यावर चर्चा व्हावी, असं परखड मत पवारांनी मांडलं. 'संरक्षण खात्यात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात लोकांना धरून आणले जाईल. त्यासंदर्भात बाहेर देशातील जो एजंट आहे, त्याला आणले आहे. त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे. आम्ही ती लवकरच जाहीर करणार असून आम्ही विरोधकांना धडा शिकवणार असल्याचं नरेंद्र मोदी हे भाषणातून सांगत आहेत. मी ते करून दाखवणारच माझे नाव मोदी आहे, असं एक प्रकारे ते सांगत आहे. मात्र , या प्रकरणी ज्यांना ताब्यात घेतले त्याची चौकशी होईल. पण दुसरीकडे चौकशीमध्ये जी नावे घेतली जात आहेत ती सत्ताधारी सांगतात तीच आहेत की काय, असाही प्रश्न आम्हाला पडला आहे. या सगळ्या गोष्टीसाठी सत्तेचा वापर केला जात आहे. त्याचा अतिरेक हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. लोकसभेतील सर्व विरोधकांना एकत्र आणून यावर आम्ही निश्चितपणे विचार करणार आहोत, असं पवारांनी स्पष्ट केलं.
केंद्राकडून स्वायत्त संस्थांवर हल्ला
देशात ज्या महत्त्वाच्या स्वायत्त संस्था आहेत, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रकार सत्तेच्या माध्यमातून केला जातोय. स्वातंत्र्यानंतर प्रथम आपण असे हल्ले या सरकारच्या काळात बघतोय. न्यायव्यवस्थेला पत्रकार परिषद घ्यावी लागते. सीबीआयमध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्यात येतोय. आरबीआय महत्त्वाची संस्था असतानाही अशा संस्थावर एक प्रकारे हल्ला होतोय. हा विरोधकांना नामशेष करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम