वर्सोव्यातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त, आयुक्तांच्या आदेशानंतर पालिकेची मोठी कारवाई

वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामांकडे काणाडोळा केल्यामुळे एका अभियंत्याचे निलंबन झाल्यानंतर पालिकेची यंत्रणा आता कामाला लागली आहे.

 मुंबई :  वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामांकडे काणाडोळा केल्यामुळे एका अभियंत्याचे निलंबन झाल्यानंतर पालिकेची यंत्रणा आता कामाला लागली आहे. पालिकेच्या पथकाने मंगळवारी वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. वेसावे येथील शिव गल्लीमधील अनधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. मुंबई महानगरपालिका आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करण्यात आली.

अंधेरी (प.) येथील वर्सोवा परिसरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरफार, मोकळ्या जमिनीवरील बांधकामे, विशेषतः वेसावे येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसर व दलदलीच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामांविषयी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. या बांधकामांवर कारवाई करण्याची सूचना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्याच आठवड्यात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दुय्यम अभियंता सोमेश शिंदे याला निलंबित केले होते. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार वर्सोव्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथकही नेमण्यात आले

वेसावे येथील दलदलीचा भाग आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र (कोस्टल रेग्यूलेशन झोन) या ठिकाणची काही अनधिकृत बांधकामे ३ आणि ४ जून रोजी निष्कासित करण्यात आली होती. मात्र ही कारवाई पूर्ण झाली नव्हती. मंगळवारी वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या तीन इमारती उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने इमारत व कारखाने विभागाने निष्कासित केल्या. यापैकी एक इमारत एक मजली, तर दोन इमारती तीन मजली होत्या.

मुंबई महानगरपालिकेचे १० अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी, ५० कामगार अशा मनुष्यबळासह दोन पोकलेन संयंत्र, दोन इलेक्ट्रिक ब्रेकर्स, तीन गॅस कटर्स आदी संसाधनांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

संबंधित पोस्ट