मुंबई कोस्टल रोडची एक मार्गिका खुली, कुठून कुठे आणि कसा करता येणार प्रवास? जाणून घ्या...

मुंबई: मुंबईतील बहुप्रतिक्षीत कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राइव्ह अशा एका मार्गिकेचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबईकरांना कोस्टल रोडच्या या मार्गिकेवरुन मंगळवारपासून प्रवास करता येणार आहे. पण सध्या आठवड्यातील पाच दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही मार्गिका खुली असणार आहे. तर शनिवार आणि रविवारी या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. वरळीपासून ते मरीन ड्राइव्हच्या दिशेनं जाणारी मार्गिका खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेमुळे पाऊण तासाचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत करणं शक्य होणार आहे.

'कोस्टल'मुळे पाऊण तासाचा प्रवास १० ते १५ मिनिटांत होणार असल्याने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलं आहे. तसंच संपूर्ण रस्ता टोलमुक्त असणार असल्याची घोषणा याआधीच करण्यात आली होती.

ही आहेत वैशिष्ट्ये

कोस्टल रोडचा दक्षिणेकडील भाग प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असेल.

१) पुलांची एकूण लांबी- २.१९ कि.मी.

२) रस्त्याची लांबी - १०.५८ कि.मी.

३) एकुण मार्गिका संख्या- ८

४) दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका- (४-४)

५) भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी - ४.३५ कि.मी.

या वाहनांना कोस्टलवर प्रवेशबंदी

१) सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, जड मालवाहने (बेस्ट/एसटी बसेस/प्रवासी वाहतूक करणारी वाहने वगळून) आणि सर्व मालवाहू वाहने.

२) सर्व प्रकारच्या दुचाकी, सायकल आणि अपंग व्यक्तींच्या मोटारसायकल/स्कूटर (साइड कारसह)

३) सर्व प्रकारची तीनचाकी वाहने

४) जनावरांनी ओढण्यात येणाऱ्या गाड्या, टांगा, हातगाड्या.

५) पादचारी

संबंधित पोस्ट