कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढत रहाणार - राजन लाड

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या झेंड्याखाली कामगारांच्या न्याय-हक्कासाठी लढत रहाणार, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष, भारतीय कामगार सेनेचे सेक्रेटरी राजन(भाई) लाड यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केले.

कामगार लढ्यात सतत व्यस्त असणारे राजन लाड यांनी आज (९ जानेवारी) ६४ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने मजदूर मंझीलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली विविध लढ्यांतून आपल्याला नेहमीच आत्मबळ मिळत गेले आहे, तर गोविंदराव मोहिते यांनी संधी दिल्यामुळे, आपल्याला अनेक लढ्यांमध्ये यश संपादन करता आले आहे, असे सांगून राजन लाड यांनी कामगार चळवळीतील विविध पैलूंवर भाष्य केले.

एक कर्तृत्ववान व्यक्तीमत्व म्हणून आपण राजन लाड यांच्याकडे पहात आलो आहोत, असे उद्गार सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी राजन लाड यांना शुभेच्छा देताना समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून काढले.

खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे, आंबेकर श्रम संशोधनचे संचालक जी.बी.गावडे, साई‌ निकम, सादीक खान, सहकारी संस्थेचे संचालक विलास डांगे, लेखक काशिनाथ माटल आदी पदाधिकाऱ्यांनी राजन (भाई) लाड यांचे अभिष्टचिंतन केले.

संबंधित पोस्ट