सम्यक समता प्रतिष्ठानचे "क्रांतीज्योती" पुरस्कार जाहीर
वपोनि ज्योती भोपळे, डॉ.अवनी कांबळे, स्पृहा इंदू, निर्मला घोरपडे, सीमा लोकरे यंदाचे मानकरी
- by Adarsh Maharashtra
- Dec 22, 2023
- 637 views
मुंबई: सम्यक समता प्रतिष्ठानचा सन २०२४ चा मानाचा "क्रांतीज्योती" पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारासाठी पोलीस दलातील आपल्या धाडसी आणि जिगरबाज कामगिरीमुळे ओळखल्या जाणाऱ्या डॅशिंग महिला अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती बागुल-भोपळे, सामाजिक भान जपत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्ये करणाऱ्या डॉ. अवनी कांबळे, शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या शिक्षिका स्पृहा सुरेश इंदू, सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई घोरपडे, चर्मोद्योग कामगार सेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्ये करणाऱ्या सीमा लोकरे यांची निवड झाली आहे. पुरस्कारार्थी मान्यवरांना कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मा. उत्कर्षा रूपवते, सदस्य - महाराष्ट्र राज्य महिला आयोग, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दैनिक आदर्श महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक ॲड.राहुल वारे भूषविणार आहेत.
ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी महिला आणि समाजातील शोषित, वंचित घटकांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे जाणले. हे कार्य तडीस नेण्यास त्यांना मनुवाद्यांकडून प्रखर विरोध सहन करावा लागला. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साथीने तत्कालीन सामाजिक विषमतेच्या विरोधात बंड करून त्यांनी समाजामध्ये शैक्षणिक आणि आधुनिक विचार रुजवून बलशाली भारत करण्यास अमूल्य असे योगदान दिले. अशा या महान कर्मयोगी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून चारकोप येथील सम्यक समता प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने "शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, महिला पोलीस, कायदेतज्ज्ञ, पत्रकारिता, महिला संघटन" अशा विविध क्षेत्रातील कर्मयोगी महिलांचा दरवर्षी "क्रांतीज्योती" पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचे पुरस्काराचे तृतीय वर्ष आहे.
आतापर्यंत या पुरस्काराने नगरसेविका संध्या दोशी, पो.नि. दीपशिखा वारे, डॉ.ज्योत्स्ना पवार, आशा ब्राह्मणे, वपोनि मंदाकिनी नरोटे, सुनंदा शिशुपाल, नंदाताई कांबळे, डॉ.अनघा आवटे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जेतवन सांस्कृतिक केंद्र,बुद्ध विहार, चारकोप, कांदिवली येथे संपन्न होणार आहे. पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव सी.ओ. ढिवरे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण साळवी, अशोक कांबळे, रघुनाथ शिरसाट, राजेश जाधव, मनोहर मोकळ, राजाराम अहिरे, भगवान घोसाळे, जी.बी.वाघमारे,दीपक निळवे, हरीश आनंद, मिलिंद खरात, मधुकर ननावरे, भाऊसाहेब केदार, सुरेंद्र मनोहर, एस.एस.पगारे, सुगंध आळेकर, साहेबराव साळुंखे आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम