कल्याण पूर्वेतील आंबेडकरी जनतेच्या ऐतिहासिक ऐक्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघणार!

स्वाभिमानी मिलिंदजी बेळमकर यांच्या पुढाकाराने सामाजिक ऐक्य परिषद!

कल्याण- कल्याण पासून ३५ ते ३६ किमी व कर्जत पासून अवघ्या ०४ ते ०५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नितांत सुंदर अश्या निसर्गरम्य भिवपूरी ह्या ऐतिहासिक ठिकाणी १२ ऑगस्ट शनिवारी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.३० अश्या वेळेत विद्रोही आंबेडकरी विचारवंत नेते स्वाभिमानी मा.मिलिंदजी बेळमकर यांच्या अध्यक्षते खाली होणाऱ्या ऐतिहासिक मॅरेथॉन अशा सामाजिक ऐक्य परिषद निमित्ताने कल्याण पूर्वेतील आंबेडकरी जनतेने सामाजिक व राजकीय ऐक्यासाठी जो बिगुल वाजवला आहे , त्याचा शंखनाद संपूर्ण महाराष्ट्रात घुमताना दिसत आहे.कल्याण पूर्वेतीलच नव्हे तर कल्याण पूर्वेच्या बाहेर असणाऱ्या सकल आंबेडकरी समाजाचे लक्ष ह्या आंबेडकरी ऐक्याकडे लागले आहे.ऐतिहासिक ठरू पाहणारे हे ऐक्य केवळ कल्याण पूर्वेलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला दिशादिग्दर्शन करणारे ठरणार आहे , ललामभूत ठरणार असल्याचे परिषदेचे प्रवक्ते व सुप्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.

भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की , वास्तविक पाहता समाजाच्या ऐक्याची तहान प्रत्येक आंबेडकरवाद्याला लागलेली आहे.तुम्ही औरंगाबाद मध्ये जा , तुम्ही उस्मानाबाद मध्ये जा , तुम्ही अहमदनगर मध्ये जा , तुम्ही नागपूर मध्ये जा , तुम्ही रत्नागिरी मध्ये जा , तुम्ही जळगाव मध्ये जा किंवा मुंबईच्या कोणत्याही उपनगरात जा , प्रत्येक ठिकाणी आंबेडकरी जनता ऐक्यासाठी आसुसलेली दिसून येईल.पण दुर्दैवाने ह्या जनतेला स्थानिक पातळीवर एकत्रित करणारा दुवा त्या त्या ठिकाणी नसल्यामुळे सामाजिक ऐक्य प्रक्रियेला खीळ बसत आहे , समाज राजकीयदृष्ट्या भरकटलेल्या स्थितीत आहे.हे सामाजिक ऐक्य साधण्यासाठी हा पुढाकार घेईल , तो पुढाकार घेईल , ह्या आशेवरच आपली अनमोल अशी वेळ खर्ची पडत आहे.पण असा पुढाकार घेताना कोणीच दिसत नाही , जो तो दुसऱ्यांवर विसंबून आहे हीच खरी खंत आहे. पण कल्याण पूर्वेच्या सुदैवाने कल्याणमधील आंबेडकरी जनतेचे नेतृत्व करणारे बहुतांश सर्वच पुढारी मंडळी ही सामाजिक दृष्ट्या , राजकीयदृष्ट्या सजग व प्रगल्भ आहेत.त्यांना सद्यस्थितीची जाण आहे , भान आहे. चळवळीचा दांडगा अनुभव आहे , रस्त्यावरच्या लढाईचा स्वानुभव आहे.आणि मुख्य म्हणजे "आपला खरा शत्रू कोण ?" याची त्यांना पूर्णपणे कल्पना असल्याने वेळीच हे नेक असणारे सारे पुढारी एक होतात.एका छताखाली येतात. निळा झेंडा हेच आमच्या अस्तित्वाचे , अस्मितेचे आणि शरण जाणारे अंतिम स्थान आहे याची जाणीव आमच्या कल्याण पूर्वेतील पुढाऱ्यांना आहे , त्यामुळे ही मंडळी एकत्रित येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आडपडदा ठेवत नाही.आम्ही याचे प्रत्यंतर खैरलांजी प्रकरणात पाहिले तसे २०१८ च्या भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळीही पाहिले.खैरलांजी असो वा भीमा कोरेगाव , कोणत्याही प्रकारचे आंदोलन असो , सगळ्यात मोठे आंदोलन हे कल्याण पूर्वेतच होते आणि याचीच प्रेरणा घेत त्याचे लोण संबंध देशात पसरते हा इतिहास आहे.त्यामुळेच ह्या ऐतिहासिक सामाजिक ऐक्य परिषद आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम आंबेडकरी विद्रोही विचारवंत , दानशूर उद्योजक स्वाभिमानी मा.मिलिंदजी बेळमकर हे केवळ एक निमित्तमात्र आहेत , खऱ्या अर्थाने ह्या परिषदेचे आपण सर्वचजण मुख्य स्तंभ आहोत , आयोजक/नियोजक/संयोजक आणि निमंत्रक/आमंत्रक , सबकुछ आपणच असल्याचे समूह संचालकांपैकी एक असणारे सुप्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आमच्या वार्ताहराला सांगितले.

संबंधित पोस्ट