
मुंबईत बेस्टकडून प्रीपेड वीज मीटर लागणार; ग्राहकांना फायदा होणार असल्याचा दावा !
- by Reporter
- Aug 09, 2023
- 466 views
मुंबई - मुंबई शहरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडून आता वीज ग्राहकांना प्रीपेड वीज मीटर लावण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाने याबाबतचे एसएमएस आपल्या ग्राहकांना पाठवण्यास सुरुवात केली आहे. या प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांचा फायदा होणार असल्याचा दावा बेस्टकडून करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष काँग्रेसने यावर गंभीर आक्षेप घेतला आहे.
सध्याच्या मीटरिंग पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी, बेस्ट उपक्रम लवकरच सर्व ग्राहकांच्या विद्यमान वीज मीटरच्या स्मार्ट प्रीपेड मीटरने मोठ्या प्रमाणात बदलण्याची आणि काही मीटर केबिनमध्ये मीटर बोर्डचे नूतनीकरणाचे काम देखील हाती घेणार आहे.त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बेस्टने केले आहे.
वितरण हानी कमी करण्यासाठी आणि ऊर्जा प्रवाह आणि ऊर्जा लेखा तसेच लेखा-परीक्षणाचे स्वयंचलित मापन सक्षम करण्यासाठी हे प्रीपेड वीज मीटर लावण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून प्रति वीज मीटर ९०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
प्रीपेड वीज मीटरचा फायदा काय?
स्मार्ट प्रीपेड मीटर वापरामुळे बेस्टचे मोबाइल अॅप वापरून विजेच्या वापराचा आढावा ग्राहकांना घेणे शक्य होणार आहे. ग्राहकांना आपल्या मोबाईल प्रीपेड कार्ड प्रमाणे वीज मीटर रिचार्ज करावे लागणार आहे. स्मार्ट मीटर्समधील बिल रिडींग डिजिटल पद्धतीने बेस्टला पाठवू शकतात. वीज वापरण्यासाठी तुम्हाला तुमचे मीटर आगाऊ रिचार्ज करणे आवश्यक आहे. प्रीपेड वीज मीटरमध्ये असलेल्या रक्कमे इतका वीजेचा वापर करता येणार आहे. मीटरमधील वीज वापरासाठी असलेले पैसे संपण्यास आल्यानंतर ग्राहकांना मेसेज पाठवून याबाबतची सूचना दिली जाणार आहे.
स्मार्ट किंवा प्रीपेड मीटरसाठी दर संरचनेत कोणताही बदल होणार नसल्याचे बेस्टने स्पष्ट केले आहे. राज्य वीज नियामक आयोगाने दिलेल्या मंजुरीनुसार, ज्या ग्राहकांकडे प्रीपेड मीटर आहे, त्यांना ऊर्जा शुल्कात दोन टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. मीटर स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे मीटर रीडिंगची अचूकता वाढेल आणि मॅन्युअल मीटर रीडिंगशी संबंधित मानवी त्रुटी दूर होतील असा दावा बेस्टने केला आहे. प्रीपेड वीज मीटर असलेल्या एखाद्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास बेस्टला त्याची सूचना तात्काळ मिळणार आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार बेस्टकडे करण्याचा त्रास वाचणार आहे.
काँग्रेसचा आक्षेप
बेस्टच्या प्रीपेड वीज मीटरवर मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आक्षेप घेतला आहे. एका प्रीपेड वीज मीटरची किंमत ९५०० रुपये आहे. त्यातील १३०० रुपये हे केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे. बेस्ट उपक्रम आधीच तोट्यात असताना दुसरीकडे या प्रीपेड वीज मीटरचा बोजा प्रशासनाच्या माथी मारण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मुंबई शहरात बेस्टच्या वीज ग्राहकां पैकी ४० टक्के झोपडपट्टीतील आहेत. तर, ३० टक्के वीज ग्राहक मध्यमवर्गीय आहेत. ऐन महिन्याच्या मध्यात अथवा अखेरीत या वर्गाला मीटर रिचार्ज करण्यास अडचणी येतील असे रवी राजा यांनी म्हटले. या प्रीपेड वीज मीटरचे कंत्राट अदानी समूहातील कंपनीला देण्यात आले असून त्यांच्या फायद्यासाठी मुंबईकरांवर आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप राजा यांनी केला.
रिपोर्टर