मोहम्मद रफींच्या स्वरातील मराठी गाणी. ३१ जुलै स्मृतीदिन निमित्त)
- by Reporter
- Jul 25, 2023
- 271 views
मुंबई (भारत कवितके) सप्तसुरांचा बादशहा स्वर्गीय मोहम्मद रफी नी आपल्या कारकिर्दीत अनेक भाषातून गाणी गायली आहेत. मोहम्मद रफीना गाणी गाताना भाषेची कुठलीही अडचण आल्याचे जाणवत नाही. " ळ" हे मराठी भाषेतील अवघड असलेल्या अक्षरा बद्दल अनेक अमराठी गायकांची अडचण निर्माण व्हायची,अमराठी गायक मराठी गाणी गाताना गाण्यात कुठे " ळ" अक्षर आहे का ते पाहत असत." ळ " या अक्षराचा धसका अनेकांनी घेतला होता.पण हेच " ळ" अक्षर मोहम्मद रफीनी आपल्या मराठी गाण्यातून अगदी सहजपणे उच्चारले.सहज ,सुंदर,स्वच्छ स्पष्ट उच्चार,गाण्यातील योग्य पध्दतीने ,गाण्यातील चढ उतार योग्य पध्दतीने घेत,मनाशी व मेंदूशी भिडणारा स्वर,ओढून ताणून न गाता,मोहम्मद रफीनी मराठी गाणी गायली. अशीच काही गाणी.....
' प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा'
हसा, मुलानों,हसा,हसा मुलानों,हसा.
बाल मनाला खळ खळून हसायला लावणारे सुंदर बालगीत,अत्यंत सोप्या भाषेतील.पण जीवनाबद्दल अतिशय मार्मिक उपदेश करणारे गीत मोहम्मद रफीनी आपल्या खास आवाजात गायले.
' शोधिशी मानवा,राऊळी मंदिरी.
नांदतो देव हा,आपुल्या अंतरी.
मेघ हे दाटती कोठूनी अंबरी?
सूर येती कसे,वाजते बासरी.
रोम रोमी फुले,तीर्थ हे भूवरी.
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी.
गंध का हासतो ,पाकळी सारुनी.
वाटते निर्झरी ,प्रेम संजीवनी.
भोवताली तुला ,साद घाली कुणी.
खूण ही जाणूनी,रुप हे ईश्वरी.
भेटतो देव का,पूजनी अर्चनी.
पुण्य का लाभते ,दान धर्मातूनी.
शोध रे दिव्यता,आपल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी?
मालकंस रागावर आधारीत असलेले हे गीत मोहम्मद रफीनी आपल्या सफाईदार,तरल आवाजात गाऊन मानवाला जीवनातील वास्तववादी सत्य उलगडून दाखविले आहे.जीवनातील काही प्रश्न्नांची उत्तरे सहजपणे या भावगीता मधून सोडविली आहेत. असचं वाटते.
' प्रभू तू दयाळू ,कृपावंत दाता
दया मागतो रे तुझी मी अनंता
हे अतिशय सोपे पण आशयघन गीत आणि शब्दरचना उमाकांत काणेकर यांची,तना मनाला ठेका धरायला लावणारे ,संगीत श्रीकांत ठाकरे यांचे आहे.तर स्वर अर्थातच मोहम्मद रफीचा.
' नको भव्य वाडा,नको गाडी घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेम वेडा.
गीतकार उमाकांत काणेकरांची खट्याळ,खोडकर ,प्रेमवीराची कैफीयत मांडणारी.सुंदर शब्दरचना,श्रीकांत ठाकरे यांचे उत्तम संगीत,आवाज मोहम्मद रफीचा,आजच्या पिढीला गुणगुणावसं वाटणारे गीत.
' नको आरती ती,नको पुष्पमाला
प्रभू तू भोवताली व्यापलेला.'
वंदना विटणकर यांचे हे अजरामर गीत,श्रीकांत ठाकरे यांचे संगीत व आवाज मोहम्मद रफीचा.सहज सुंदर शब्द,उत्तम परिपक्व संगीत,यामुळे हे गाणे फारच श्रवणीय झाले आहे. मोहम्मद रफीचा मधाळगोड आवाज अगदी डोळे मिटून शांतपणे ऐकावेसे वाटणारे गीत.
' तुज सर्व रंगी,रुप उदारा
कळले सांग कुणाला?
खेळ तुझा न्यारा.'
जीवन आणि मरण यातील त्रीवार सत्य सांगणारे जीवनातील वास्तववादी तत्वज्ञानाचे स्वरुप उलगडणारे हे शब्द .या भक्तीगीता वाटे मोहम्मद रफीनी सुरेख गायले,अर्थात संगीत,आवाज,व शब्द मनाला स्पर्शून जातात.
' हे मना आज कोणी बघ तुला साद घाली
हा वारा तान घेई,निर्झर ही साद देई.'
मानवी मन व निसर्ग यांची सांगड घालणारे शब्द,मोहम्मद रफीनी गायलेले हे गाणे कधी संपूच नये असे वाटते.आणि
' अग पोरी सांभाल दर्याला तुफान आलय भारी' हे खट्याळ कोळीगीत मोहम्मद रफीनी गाऊन अजरामर केले आहे. अशा प्रकारची मराठी भाषेतील काही गाणी स्वर्गीय मोहम्मद रफीनी गायली आहेत.३१ जुलै मोहम्मद रफी यांचा स्मृतीदिन निमित्त विनम्र आभिवादन!
रिपोर्टर