
‘मुंबई 2.0’ परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मांडले पायाभूत सुविधांचे चित्र
यावेळी अभिनेता शाहरुख खान याने मुंबईतील पायाभूत सुविधा, विविध विकास प्रकल्प, बॉलिवूडच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना बोलते केले.
- by Adarsh Maharashtra
- Dec 01, 2018
- 1255 views
मुंबई, दि. 1 : मुंबई महानगर प्रदेशाचा नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो अंतिम करण्यात येणार आहे. मेट्रोसारख्या वाहतूक प्रकल्पांमुळे सिमलेस कनेक्टिविटी निर्माण होणार आहे. त्यातून महानगर प्रदेशाचा सुनियोजित विकास करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासन आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई 2.0 या परिषदेत उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या परिषदेत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, प्राईस वॉटरहाऊस कॉपर्सचे प्रमुख हजिम गलाल, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह उद्योग जगतातील प्रमुख, कार्यकारी अधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प, विविध विकास कामे,भविष्यातील मुंबई याबद्दल या परिषदेतील विविध परिसंवादात चर्चा झाली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई हे मल्टिब्रॅण्ड शहर आहे. स्टार्टअपमध्ये देशात मुंबई अव्वल आहे. 25 टक्के स्टार्टअप एकट्या मुंबईत असून दुसऱ्या क्रमांकावर बेंगलोर 16 टक्के आहे, तर दिल्लीत 12 टक्के स्टार्टअप आहेत. मुंबई ही देशाची आर्थिकबरोबरच फिनटेक, माहिती तंत्रज्ञान व स्टार्टअप राजधानी म्हणून उदयास येत आहे. मुंबईमध्ये वाणिज्यिक जागांची कमतरता आहे. पण नव्या विकास आराखड्यात यासाठी तरतूद केली असून त्यामुळे परवडणाऱ्या दरातील वाणिज्यिक जागा मिळण्यास मदत होणार आहे.
मुंबईच्या नव्या विकास आराखड्यामुळे जमिनी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे 10 लाख परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रीडांगणासाठी मोकळी जागा, वाणिज्यिक वापरासाठी जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे क्रीडा सुविधा पुरविण्याचे काम करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सुविधांमुळे 20 फिनटेक, माहिती तंत्रज्ञान पार्क उभे राहणार आहेत,असेही त्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मेट्रो, शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड, आदी प्रकल्पाची कामे वेगाने सुरू आहेत. मुंबईसाठी वेगळा मुख्य कार्यकारी अधिकारी असावा ही कल्पना चांगली असली तरी लोकशाही व्यवस्थेमध्ये ती शक्य नव्हती. त्यामुळे आम्ही ‘वॉर रूम; सुरू केली. या माध्यमातून विविध प्रकल्पांच्या कामावर लक्ष ठेवले जात आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधून हे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे मेट्रोचे जाळे निर्माण होत असून अनेक प्रकल्पांची कामे संकल्पना तयार झाल्यापासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास एक वर्षापेक्षा कमी कालावधी लागला. मुंबईतील सांडपाणी समुद्रात जात होते. यावर उपाय म्हणून येत्या 2/3 महिन्यात मुंबईत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार असून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी समुद्रात सोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
श्री. फडणवीस म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचे परवाने अगदी कमी कालावधीत आणले. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यातील समन्वय व अधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या क्षमतेमुळे हे शक्य झाले आहे. ‘एमएमआरडीए’ने भिवंडी येथे लॉजीस्टिक पार्क सुरू केले आहे. त्यासाठी नियमातसुद्धा बदल केले आहेत. त्याचप्रमाणे सिडकोच्यावतीने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे सुद्धा लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. धारावी विकास प्रकल्पाचे नियोजन गेल्या 20 वर्षांपासून सुरू होते. त्यामधील समस्यांवर काही उपाय शोधला जात नव्हता. मात्र, आता याला वेग आला असून लवकरच काम सुरू होणार आहे.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील नैना भागामुळे मुंबई विस्तारत आहे. कल्याण येथे ग्रोथ सेंटर उभारण्यात येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध होणार आहे. हॉटेल, चित्रीकरण यासाठी लागणाऱ्या परवान्याची संख्या कमी केली आहे. या परिसंवादातील सूचना, कल्पना प्रत्यक्षात आणून शाश्वत विकासासाठी प्रकल्प सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपस्थित मान्यवरांच्या प्रश्नांना उत्तरे देताना फडणवीस म्हणाले, जनतेचा वेळ वाचविण्यासाठी सेवा हमी कायदा आणला. याद्वारे पाच कोटी अर्ज स्वीकारले असून 93 टक्के अर्जांचे निराकरण केले. बांधकाम व्यावसायिकांपासून फसवणूक टाळण्यासाठी रेरा कायदा केला असून यात आणखी सुधारणा केल्या जातील.
मुख्यमंत्र्यांनी दिली शाहरूख खानच्या प्रश्नांना उत्तरे
यावेळी अभिनेता शाहरुख खान याने मुंबईतील पायाभूत सुविधा, विविध विकास प्रकल्प, बॉलिवूडच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलते केले.
अभिनेता शाहरूख खान यांनी विचारलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबईबद्दलच्या व्हिजन वर मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी अनेकजण मुंबईला शांघाय करण्याचे बोलत होते. पण मुंबई ही मुंबई आहे. त्याचे एक वेगळे कल्चर, स्पिरीट आहे. मुंबईचे एक वेगळे फ्लेवर आहे. हा फ्लेवर टिकवून ठेवून त्याला आणखी ॲक्सेसेंबल करण्याचे काम करत आहे. मुंबईने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली आहे. मात्र, अजूनही अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. अश्या लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे माझे व्हिजन/मिशन आहे.
मुंबईत बदल कसा घडवून आणणार याबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून मुंबईकर झालोय. मुंबईत क्षमता आहे. मुंबई ही ग्लोबल सिटी असून इथे 45 टक्के जनता झोपडपट्टीत राहते, शहराला झोपडपट्टीमुक्त करायचे आहे. त्यामुळे पदावर आल्यानंतर प्रथम मुंबईतील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला आहे.
शासनाच्या योजना व धोरणाबाबत नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत, यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई ही सांस्कृतिक राजधानी आहे. वाहतूक समस्या आहे, मात्र मेट्रो आल्यानंतर ही समस्या सुटणार असल्याने मुंबईकर तक्रार करीत नाहीत. जनतेच्या सहभागानेच राज्याचा विकास होत असल्याने अनेक योजनात व धोरणात जनतेला सामावून घेतले जात आहे.
मुंबईमध्ये जगातली सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिज्युल व स्पेशल इफेक्ट आणि ॲनिमेशनच्या अभ्यासासाठी मुंबईत संस्था उभारण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीने ब्ल्यू प्रिंट तयार करावी, याला शासन सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र व उद्योगासाठी शासनाने धोरणात बदल केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
व्यावसायिक शिक्षणाविषयी मुख्यमंत्री म्हणाले, सध्या कौशल्य विकासावर आधारित शिक्षण देण्यावर भर आहे. यासाठी केंद्र शासनाने नियमातही बदल केले असून व्यावसायिक शिक्षण देणारी परदेशी विद्यापीठे राज्यात येत आहेत. नवीन नोकऱ्या, मानवी संसाधने तयार करणारे शिक्षण देण्यासाठी परदेशी संस्था व विद्यापीठे यांच्यात सहकार्य होत आहे.
यावेळी शाहरूख खान यांनी आपण स्वत: शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे जाहीर केले. मुंबईतील जुन्या वस्तू, ठिकाणे, संस्कृती जपून ठेवण्यासाठी संग्रह केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेणार असून मुंबईला 'मॅजिकल मुंबई' बनवायचे आहे. मुंबईतील सांस्कृतिक, कला, नेपथ्य आदींसह सर्व क्षेत्रातील कल्पक व्यक्तींना घेऊन मुंबईला 'क्रिएटिव्ह हब' बनवायचा संकल्प शाहरूख खान याने बोलून दाखविला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम