शिपायाने काढला काटा, सरपंचासहित ग्रामसेवक तुरुंगात, असं काय घडलं ?

नाशिक : लाचखोरीचं लोण आता ग्रामीण भागातही पसरत चालले आहे. दोन आठवड्या पूर्वी निफाड तालुक्यातील कोतवालाला लाच  घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर भूमीअभिलेखच्या अतिरिक्त उपसंचालक पदाचा कार्यभार असलेल्या भूमीअभिलेख अधिक्षकासह एका सहकारी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले होते. याची अजूनही गावावरच्या पारावर चर्चा सुरू असतांना दुसरिकडे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील  बलायदुरी गावात एसीबीने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि माजी सरपंचाला पन्नास हजाराची लाच घेतांना अटक केली आहे. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे

इगतपुरी तालुक्यातील या कारवाईने नाशिक जिल्ह्यातील गावागावात कारवाईची चर्चा होऊ लागली आहे. लाच घेतांना अटक झाल्याने दबक्या आवाजात गावकरी उलटसुलट चर्चा करत आहे.

बलायदुरी ग्रामपंचायतीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून काही रक्कम तक्रारदार शिपायाला दिली जाणार होती. १ लाख ६४ हजार ६८२ रुपये इतकी ती रक्कम होती.हीच रक्कम देण्याच्या बदल्यात ग्रामपंचायतीचे आजी माजी संरपंच आणि ग्रामसेवक यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली, त्यानंतर ६० वर्षीय तक्रारदार यांनी थेट एसीबीचं कार्यालय गाठलं.

सेवानिवृत्त झालेले शिपाई यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सर्व माहिती दिली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.या कारवाई सरपंच हिरामण पांडुरंग दुभाषे, ग्रामसेविका आशा देवराम गोडसे, माजी सरपंच मल्हारी पंढरीनाथ गटकळ यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली आहे.

सेवानिवृत्तीचे पैसे घेण्याच्या बदल्यात पन्नास हजारांची लाच मागणं गावच्या पुढाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यामध्ये टाकेघोटी ग्रामपंचायतमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.गावखेड्यातही आता लाचखोरीच्या घटना उघडकीस येऊ लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने अनेकांना धडकी भरली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक पडी शर्मिष्ठा वालावलकर यांनी नियुक्ती झाल्यापासून कारवायांमध्ये वाढ झाली असून सापळे रचून ते यशस्वी होतांना दिसून येत आहे.

इगतपुरी येथे झालेल्या कारवाईत एसीबीच्या पथकात संदीप घुगे, वैशाली पाटील, एकनाथ बाविस्कर, राजेंद्र जाधव, शरद हेंबाडे, नितीन नेटारे, संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता.

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन एसीबीकरून करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट