संत झेवियर महाविद्यालय-इंडियन म्युझिक ग्रुपच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात 'जॅनफेस्ट २०२३' ची मेजवानी'या विकेंड ला'

 मुंबई  (मंगेश फदाले) ;तब्बल २ वर्षांच्या अवकाशानंतर संत झेवियर महाविद्यालयाचा इंडियन म्युझिक ग्रुप आपला शास्त्रीय संगीताचा उत्सव 'जॅन फेस्ट' अभिमानाने परत एकदा सादर करत आहे. या आधीच्या 'जॅन फेस्ट'

मध्ये अनेक दिग्गज  कलाकारांचे सादरीकरण ऐकण्याचे भाग्य आपल्याला यापूर्वी मिळालेले आहे. ह्या वेळीही अशाच दिग्गज व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीने रसिक श्रोते निश्चितच मंत्रमुग्ध होतील अशी खात्री असल्याची प्रतिक्रिया 'जॅन फेस्ट' २०२३ च्या विद्यार्थिनी सचिव गौरवी प्रधान व्यक्त करतात.

ह्या वर्षी 'जॅन फेस्ट' शनि. २८ व रवि. २९ जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे. दोन्ही दिवशी 'जॅन फेस्ट' चे सत्र सायंकाळी साडे पाच वाजता आरंभ होईल. पहिल्या दिवशी 'स्ट्रिंग्स अटॅच्ड' हे विद्वान आर. कुमारेश आणि डॉ. जयंती कुमारेश यांचे सादरीकरण आणि पंडित आनंद भाटे यांचे गायन पहिल्या दोन सत्रांत होईल. तृतीय सत्रात पं. राहुल शर्मा यांच्या संतूर वादनाने पहिल्या दिवसाची स्वरमय सांगता होईल. 

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला उस्ताद तौफिक कुरेशी, श्री. सारंग कुलकर्णी, श्री. शिखरानंद कुरेशी, आणि श्री. कौशिकी जोगळेकर ह्यांच्या 'सूर्या' या वाद्यवृंदाचे सादरीकरण होईल आणि त्यानंतर पं. जसराज यांच्या शिष्या श्रीमती. अंकिता जोशी यांचे गायन होईल. अंतिम सत्रात उस्ताद शुजाअत खाँ यांच्या सतार वादनाने 'जॅन फेस्ट' चा अंतिम सोहळा पार पडेल.

रसिक श्रोत्यांना अनेक उत्तमोत्तम सांगितिक मैफिलींचा आनंद मिळवून देण्याची परंपरा जतन करण्यासाठी इंडियन म्युझिक ग्रुप आणि 'जॅन फेस्ट' कार्यकारीणी सदैव तत्पर असल्याचे कार्यकारीणी सदस्य विद्यार्थिनी मधुश्री हंबर्डे सांगतात.

आय.एम.जी च्या २०२२-२३ च्या सचिव गौरवी प्रधान , कार्यकारिणी  सदस्य मधुश्री हंबर्डे , मेघना बंजन , अनन्या महाले , प्रसिध्दी विभागाच्या प्रमुख सुलक्षणा थोडा, खजिना विभागाच्या कसद सोनी , स्वयंसेवक साम्या दिवाण यांच्या सह 'जॅनफेस्ट' यशस्वी होण्यासाठी दोनशे हून अधिक स्वयंसेवक मागील ४ महिने झटत आहेत. 

तसेच भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये वाजवली जाणारी पारंपरिक वाद्य आणि इंडीयन म्युजिक ग्रुप ची म्युजिक लायब्ररी दर्शविणारे मोठे रंगीत चित्र नंदिनी यादव, राधे ठक्कर, नताशा मिरानी, अनुष्का डे, मीनल , मर्लिन या आणि अशा अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने चितारले असून ते महाविद्यालयाच्या स्वागत कक्षात मोठ्या दिमाखात झळकवले गेले आहे. 

जॅन फेस्टला सलग २१ वर्षे येणारे एक रसिक श्रोते असलेले वकील उस्ताद भीमसेन जोशी यांच्या स्वर्गीय सुराची एक आठवण आदर पूर्वक  सांगताना ५० वर्षांच्या आय.एम.जी च्या उत्तम व्यवस्थापनाचे कौतुकही करतात.

'जॅन फेस्ट' च्या संगीत रजनी व्यतिरिक्त झेवियरच्या विद्यार्थ्यांनी रंगवलेली चित्र आणि तयार केलेल्या हस्तकलेच्या विविध आकर्षक वस्तू महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रदर्शन आणि विक्रीसाठी २ दिवस या वेळी ठेवण्यात येणार आहेत. रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत खिळवून ठेवणारा 'जॅन फेस्ट' हा दरवर्षी संगीता सोबतच कलेचा आविष्कार ही तितक्याच खुबीने साकारण्याचा प्रयत्न करत असतो.

'जॅन फेस्ट' साठीच्या देणगी प्रवेशिका संत झेवियर (स्वायत्त) महाविद्यालय , मुंबई येथे रोज दुपारी १२ ते ६.३० आणि रविवारी सकाळी १० ते ६.३० या वेळेत  उपलब्ध आहेत.

संबंधित पोस्ट