सम्यक समता प्रतिष्ठानचे "क्रांतिज्योती" पुरस्कार जाहीर
वपोनि मंदाकिनी नरोटे, डॉ. अनघा आवटे, नंदाताई कांबळे, सुनंदा शिशुपाल यंदाचे मानकरी
- by Reporter
- Dec 28, 2022
- 285 views
ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी महिला आणि समाजातील शोषित, वंचित घटकांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे जाणले. हे कार्य तडीस नेण्यास त्यांना मनुवाद्यांकडून प्रखर विरोध सहन करावा लागला. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साथीने तत्कालीन सामाजिक विषमतेच्या विरोधात बंड करून त्यांनी समाजामध्ये शैक्षणिक आणि आधुनिक विचार रुजवून बलशाली भारत करण्यास अमूल्य असे योगदान दिले.
अशा या महान कर्मयोगी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून चारकोप येथील सम्यक समता प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने "शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, महिला पोलीस, कायदेतज्ज्ञ, पत्रकारिता, महिला संघटन" अशा विविध क्षेत्रातील कर्मयोगी महिलांचा दरवर्षी "क्रांतीज्योती" पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचे पुरस्काराचे द्वितीय वर्ष आहे.
पोलीस दलातील आपल्या धाडसी आणि जिगरबाज कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या डॅशिंग महिला अधिकारी, गोराई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदाकिनी नरोटे, वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक भान जपत उल्लेखनीय कार्ये करणाऱ्या डॉ. अनघा आवटे, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापिका नंदाताई कांबळे, प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय सेवा बजाविणाऱ्या निवृत्त कस्टम अधिकारी सुनंदा शिशुपाल आदी मान्यवरांना ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, आयदानकर उर्मिलाताई पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दैनिक आदर्श महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक ॲड.राहुल वारे भूषविणार आहेत.
हा पुरस्कार सोहळा शनिवारी, दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी जेतवन सांस्कृतिक केंद्र,बुद्ध विहार, चारकोप, कांदिवली येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव सी.ओ. ढिवरे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण साळवी, अशोक कांबळे, रमेश गणवीर, मधुकर ननावरे, भाऊसाहेब केदार, रघुनाथ शिरसाट, सुगंध आळेकर, जी.बी.वाघमारे, अशोक अहिरे, एस.एस.पगारे, रवींद्र गजभिये, मिलिंद खरात, साहेबराव साळुंखे, दिलीप शिशुपाल आदी मान्यवर विशेष परिश्रम घेत आहेत.
रिपोर्टर