गुजरात निकाल म्हणजे देशवासी भा.ज.पा च्या बाजूने नाहीत - शरद पवार
- by Reporter
- Dec 08, 2022
- 346 views
मुंबई:( मंगेश फदाले )गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरात मध्ये एकतर्फी निकाल लागला.
गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही. याचे उत्तम उदाहरण दिल्ली महानगर पालिकेमध्ये तिथल्या जनतेने दाखवले असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केले.
गेली १५ वर्षे दिल्ली महानगर पालिकेत भा.ज.पा.ची सत्ता होती ती आता राहिलेली नाही. काल हिमाचल प्रदेशची निवडणूक झाली. तिथे भाजपाचे राज्य होते. आताच्या माहिती नुसार भाजपाला तिथे २७ जागा मिळाल्या आणि ३७ जागा काँग्रेसला मिळाल्या. आज हिमाचल मध्ये भा.ज.पा.चे राज्य गेले. दिल्ली मधील राज्य गेले. याचा अर्थ हळूहळू बदल व्हायला लागला आहे. राजकारणात पोकळी असते. गुजरातची पोकळी भा.ज.पा.ने भरून काढली आणि दिल्लीची पोकळी केजरीवाल यांच्या आपने भरून काढली. आज अनेकांना बदल हवे आहेत त्याची नोंद राजकीय जाणकार कार्यकर्त्यानी घेऊन ती पोकळी भरून काढण्यासाठी आवश्यक ते कार्यक्रम घेतले पाहिजे.
आज महाराष्ट्रात ती पोकळी आहे, त्या पोकळीला सामोरे जाऊन जनतेला पर्याय द्यायची ताकद कोणा पक्षात असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान आपण कमीत कमी भा.ज.पा.च्या प्रवृत्ती विरुद्ध असलेल्या शक्ती आहेत त्या एकत्रित कशा करता येतील व त्या एकत्रित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना या सर्व कामात प्रोत्साहित करता येईल , निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पक्षाचे जिल्हा , तालुका , राज्याचे सर्व सहकारी कसे महत्वाची कामगिरी करतील हे बघण्याची आवश्यकता आहे असे आवाहनही शरद पवार यांनी प्रमुख नेत्यांना केले.
काल विरोधकांच्या झालेल्या बैठकीचा पुढाकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. इतर पक्षांनी ते धोरण मान्य केले. असेच कार्यक्रम इथून पुढे घेण्याचे काम पक्षाच्या नेतृत्वाकडून होतेय , याचा अर्थ हा घ्यावा लागेल की जी पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करतो आहे. यासाठी प्रत्येकाला आपआपल्या भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. नगरपालिका , महानगर पालिका जिल्हा परिषद अशा निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. जरी या निवडणुका लांबणीवर पडल्या तरी आपण आपले काम चालूच ठेवले पाहिजे. शक्यतो या निवडणुकीत नवी पिढी किती अधिक आणता येईल. त्यांना प्रोत्साहित कसे करता येईल याबद्दलचा दृष्टीकोन वरिष्ठ नेत्यांनी ठेवला पाहिजे. ही निवड करताना त्या - त्या भागातील होतकरू तरूण कार्यकर्त्याला नाऊमेद करता कामा नये. यातून अपेक्षा अशी आहे की, भविष्यात या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक दुसरी फळी तयार होईल. तिच्या हाती सूत्र देऊन काम करण्याची आज आवश्यकता आहे असेही शरद पवार म्हणाले.
रिपोर्टर