लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार - अजित पवार

मुंबई (मंगेश फदाले ) लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा अशी आग्रही मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठीत म्हण आहे  'चार दिवस सासूचे तसेच चार दिवस सुनेचे' असतात हीपण गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यावी असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी  माध्यमांशी बोलताना दिला. 

या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत त्याला बगल देण्याचे काम होते हे महाराष्ट्राला मारक आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. 

सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता जर कुणी कायदा हाती घेतला, चूक केली, नियमाप्रमाणे वागले नाही तर जरूर कारवाई करावी. मात्र कुणीतरी कारण नसताना नवीन जे कायदे - नियम केले आहेत त्याचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे , जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असेल तर याकडे जनतेने जागरुकतेने पहावे असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

संबंधित पोस्ट