आयकर अधिकारी बनवून केली 20 लाखांची फसवणूक

माटुंगा - आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून पुण्यातील एका व्यावसायिकाची  20 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली आहे. या आरोपींनी पुण्यातील या व्यावसायिकाला जास्त पैसे देण्याचे आमिष देत बनावटी नोट  देऊन त्यांची फसवणूक केली. फसवणूक करून आरोपींनी पुणे सोडलं मात्र ते माटुंगा पोलिसांच्या जाळ्यात अडकले. देवराव भाऊराव हिवराळे, रविकांत जर्नादन हिवराळे  आणि योगेश वासुदेव हिवराळे अशी आरोपींची नवे असून हे सर्व बुलढाणा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


पुणे येथील व्यावसायिक रामदास दत्तात्रय बल्लाळ यांना आरोपींनी आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवले. या आरोपींनी त्यांना आपण आयकराच्या धाडीत अनेक रुपयांची रोकड जप्त केल्याचं सांगितलं. तसेच त्यांना नोटा बदली करण्याचे सांगत तुम्हाला 20 लाखांच्या बदल्यात 40 लाख रुपये देऊ, असे आमिष दाखवले. आरोपींनी रामदास बल्लाळ यांची मुंबई मधील नामांकीत व महागडया ओबेरॉय हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, प्रितम हॉटेल अशा ठिकाणी भेटी घेतल्या. तसेच त्यांना मर्सडीस, फोरमॅटीक, हुंदाई क्रेटा, फॉर्च्युन अशा अलीशान कारमधून फिरवून त्यांचा विश्वास संपादित केला. यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून 20 लाख रुपयांची रोकड घेतली. यानंतर आरोपींनी त्यांना 40 लाख रुपये देऊ असे सांगत चक्क  'भारतीय बच्चों का बँक' असे लिहलेल्या बनावट नोटांची बॅग देत त्यांची फसवणूक केली. यानंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी या तिन्ही आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांवर माटुंगा पोलिसांनी कलम 120 (5), 406, 419, 420, 482 (ब), (वा) भादवि अन्यये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या देवराव भाऊराव हिवराळे याच्या विरोधात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही विविध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. या तिन्ही आरोपींची अशाच प्रकरणे आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे, याची माटुंगा पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.

संबंधित पोस्ट