'राष्ट्रवादी मंथन... वेध भविष्याचा' ! राष्ट्रवादीच्या शिबीराला शिर्डीत सुरुवात !
- by Reporter
- Nov 04, 2022
- 492 views
शिर्डी ( मंगेश फदाले ) आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्यांकडून राष्ट्रवादीवर टिका होत आहे असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. या शिबीराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. आदरणीय शरद पवारसाहेब या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत, अस्वस्थ शेतकरी आहे सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला निवेदन दिले मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही याबद्दल तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोचवा ती लोकांपर्यंत जायला हवीत असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते असे जयंत पाटील म्हणाले.
या शिबिराला ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खा.सुनिल तटकरे, मा. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खा.श्रीनिवास पाटील, खा.सुप्रियाताई सुळे, मा.मंत्री राजेश टोपे, मा.मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मा.मंत्री धनंजय मुंडे, खा.फौजिया खान, खा.वंदना चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मा.मंत्री दत्तात्रय भरणे, मा.मंत्री आदिती तटकरे, मा.मंत्री बाळासाहेब पाटील, मा.मंत्री राजेंद्र शिंगणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मा.मंत्री एकनाथ खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार आशुतोष काळे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रवक्ते, सरचिटणीस, फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख, संघटक सचिव, महिला प्रदेशाध्यक्षा, युवक प्रदेशाध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्षा, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आदींसह सर्व निमंत्रित उपस्थित होते.
रिपोर्टर