
दामोदर नाट्यगृह शताब्दी महोत्सवाची सांगता
- by Reporter
- Oct 13, 2022
- 455 views
मुंबई :, गेले पाच दिवस सुरू असलेला दामोदर नाट्यगृहाचा शताब्दी सोहळा आज रोजी पार पडला. याप्रसंगी सोशल सर्व्हिस लीग शाळेच्या विद्यार्थ्यांच्या करमणुकीचा कार्यक्रम, 'अद्वैत' एकांकिका स्पर्धा अंतिम फेरी, दिव्यांग मुलांचा कार्यक्रम, दशावतार नाटक, शक्ती तुरा सामना, भूपाळी ते भैरवी हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कृत केलेला सांस्कृतिक कार्यक्रम, 'मराठी पाऊल पडते पुढे' हा वाद्यवृंद, 'खरा ब्राह्मण' (ले. प्रबोधनकार ठाकरे), 'सरनोबत' (ले. र. शा. चव्हाण), 'शिवबा' प्रा. डॉ. प्रदीप ढवळ अशी तीन नाटके, श्री शंकरा प्रस्तुत 'कवी संमेलन' आणि जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक व कलावंतांसाठी परिसंवादाचा भरगच्च कार्यक्रमाचा आस्वाद नाट्यप्रेमी रसिकांना घेता आला.
दामोदर नाट्यगृह १९२२ साली उपलब्ध झाले व अनेक कलाकारांनी चेहऱ्यावर पहिल्यांदा रंग येथे लावला, नाट्यगृहात प्रत्येक पावसात पाणी भरते पण इथे रंगमंचावर प्रत्यक्ष पाऊस पडण्यासाठी पाण्याचा वर्षाव करणारे पाईप येथे डोक्यावर लावलेले होते असा उल्लेख करत आपण या रंगभूमीचे कायम ऋणी राहू अशी भावना नाट्यकलावंत प्रमोद पवार यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली. प्रशासकीय कामकाजानिमित्ताने अनेक वेळा दामोदर नाट्यगृह आणि शाळेशी संबंध आला मात्र या शाळेची इतक्या वर्षाची परंपरा ही आज येथे येऊन कळली असे उद्गार भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी चंद्रशेखर ओक यांनी काढले.
त्यानंतर 'अद्वैत' एकांकिका स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. यावेळी योगेश सोमण, अंबर हडप, जयवंत वाडकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, विजय कदम, राजेश देशपांडे हे नाट्यकर्मी उपस्थित होते. दूरचित्रवाणी माध्यमातून आपली कारकीर्द सुरू करून चित्रपटसृष्टीत जाताना अशी नाट्यगृह ही आपली शिडी ठरतात असे हिंदी नाट्यसृष्टीतील संगीता रावत म्हणाल्या. याप्रसंगी बाबुलाल तोडी हे तोडी उद्योग समूहाचे उद्योगपती उपस्थित होते. त्यांनी शताब्दी असलेल्या सोशल सर्व्हिस लीगच्या रात्रशाळेचे कौतुक करून उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पाचही दिवस अनेक रंगकर्मी यांनी आपली येजा ठेवली होती. या परिसराला नाट्यजत्रेचे स्वरूप आले होते. नाट्यकलाकार उपेंद्र दाते यांनी या नाट्यगृहाच्या व्यवस्थापन मंडळाचे कौतुक केलेच आणि आपण सहकारी मनोरंजन मंडळाचीही याप्रसंगी शताब्दी झाली याबद्दल भावपूर्ण उद्गार काढले.
गिरणगावातील पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी काव्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भाई मयेकर, रामदास फुटाणे, नीरजा, अरुण म्हात्रे, संभाजी भगत यांनी सुर्वेंच्या कविता सादर करताना कष्टकऱ्यांचा, कामगारातून घडलेला कवी नारायण सुर्वे यांच्या आठवणी आणि कविता सादर केल्या. संस्थेने नाट्यकर्मी लोकांबरोबर कवितांनाही शतक महोत्सवी कार्यक्रमात योग्य वेळ दिला यातून कविता क्रांतिकारक ठरते याची साक्ष आहे असे मत व्यक्त करत रामदास फुटाणे यांनी आपल्या राजकीय भाष्यरचना सादर केल्या. संचालक मंडळ सदस्य प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांनीही नारायण सुर्वे यांची कविता सादर केली.
शाळेच्या विद्यार्थी कलारंग कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित निर्माते, दिग्दर्शक किरण शांताराम यांनी कलावंत विद्यार्थ्यांची मुक्तकंठाने स्तुती करत नाट्यगृहाच्या व्यवस्थापनात एक अग्रणी शतक महोत्सवी शाळा आहे, हे आपल्याला ठाऊक नव्हते असे सांगताना हा परिसर हा भावी काळात विकसित होताना सांस्कृतिक केंद्र कसे होईल हे पाहणे मला महत्त्वाचे वाटते असे सांगत आपलाही सक्रिय सहभाग यात द्यायला मी तयार आहे अशी इच्छा व्यक्त केली. नाट्य व सिनेकलावंत अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांनी संस्थेच्या इतिहास दाखवणाऱ्या रांगोळीचे कौतुक केले आणि या रंगमंचावर माझा वावर हा कायम राहिला आणि रंगमंचावर उभे राहिल्यावर साहित्य आतून ओठाशी येतेच असे म्हणत अविनाश यांनी आपल्या नाटकातील स्वगत सादर केले व आपली नाट्यगृहाबाबतची कृतज्ञता व्यक्त केली.
महाराष्ट्रातील कलाप्रेमी व लोकप्रिय नेते जयंत पाटील यांनी नाट्यगृह आणि संस्थेच्या सोबत मुंबईतील सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाश कसे विस्तारत गेले याचा आढावा घेत असे स्पष्ट केले की, मला नाट्यगृहात येण्याचा योग अनेकदा आला पण या संस्थेने माझ्या कारकिर्दीत किंवा संपूर्ण कार्यकाळात कधीही शासनाकडे मागणी न करता आपले उपक्रम केले याबाबत संचालकांचे कौतुक वाटते असे सांगितले. रंगकर्मीना बळ देणाऱ्या अशा संस्था या सांस्कृतिक संपन्न वारसा जपत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ अभिनेते आणि व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपटाची जाण असलेले अशोक सराफ यांच्या हस्ते अनेक कलाकारांचे सन्मान करण्यात आले.
या संस्थेचे कार्य मला माहीत असून त्यांनी समस्त पिढी या नाट्यगृहाच्या माध्यमातून सुसंस्कृत केली असल्याचे अशोक सराफ म्हणाले. रंगमंचाच्या पाठीमागे कार्य करणाऱ्या अनेक कलावंतांची (बॅकस्टेज आर्टिस्ट) रसिकांना माहितीही नसते, त्यांच्या सर्वांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या छायाचित्राचे प्रदर्शन येथे केले गेले याचे अशोक सराफ यांनी कौतुक केले. अनेक रंगकर्मींनी या प्रदर्शनातील फोटो सोबत आपले सेल्फी काढले. निर्माते ऍड. प्रवीण राणे यांनी या रंगमंचाला नवीन स्वरूप देताना जेव्हा हे नाट्यगृह पाडले जाईल तेव्हा सर्व कलावंतांनी येथील माती घेऊन आपल्या देव्हाऱ्यात ठेवावी एवढी आमची नाळ या रंगभूमीशी जोडली असल्याचे स्पष्ट केले. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संगीत दिग्दर्शक अरविंद हळदीपूर यांनीही नाट्यगृहाबाबतचे ऋण व्यक्त केले. शाळेच्या अनेक विद्यार्थ्यानाही या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला. शाळेच्या माजी विद्यार्थी संघाने आयोजित केलेल्या वाद्यवृंदाच्या प्रसंगी शाळेतून शिकलेले विद्यार्थी प्रल्हाद कुडतडकर आणि रसिका वेंगुर्लेकर यांनी आपल्या शाळेपासून थेट दूरदर्शनच्या देशव्यापी पडद्यापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला. यावेळी त्यांनी आपल्या वयोवृद्ध शिक्षकांना भेटून आपले कार्यकर्तृत्व सांगितले. शाळेतील शिक्षकांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. शाळेचेच विद्यार्थी असलेले शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते. त्यांनी आपण सर्व शिक्षकांना घेऊन एखादी सहल आयोजित करूया असा विचार व्यक्त केला. या प्रसंगी रेनबो एफएम वाहिनीवरील आरजे रश्मी यांनीही संस्थेचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष आनंद माईणकर यांनी आपल्या भाषणात या संस्थेचे मागील काळातील संचालक नारायण चंदावरकर, टाटाग्रुपचे जमशेदजी जीजीभाई, बी. एन. मोतीवाला, जस्टीस दिवाण बहादुर के. एम. जव्हेरी, प्रा. टी. ए. कुलकर्णी, पद्मविभूषण जी. एल. मेहता, पद्मभूषण एच. डी. पारेख, पद्मभूषण एस. एस. नाडकर्णी, पद्मभूषण पी. व्ही. गांधी, डॉ. एस. पी. आडारकर, रवींद्र पाटकर, ना. म. जोशी, वैकुंठलाल मेहता - अर्थमंत्री, बॉम्बे स्टेट, जस्टीस गजेंद्रगडकर, जस्टीस तारकुंडे, व्हाईस चॅन्सलर टि. के. टोपे, महापालिका आयुक्त एस. एस. तिनईकर यांच्यासारख्यांनी संस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळून या संस्थेला स्थैर्य मिळवून दिले, त्याबद्दल आपण त्यांचे कायम ऋणी आहोत असे सांगितले. आपण केवळ त्यांनी दिलेल्या मार्गावरून चालत आहोत असा कृतज्ञतापूर्वक उल्लेखही त्यांनी केला. संस्थेच्या माजी संचालक मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एका परिसंवादाचे आयोजनही केले होते, त्यासाठी मुंबईतील विविध भागातून जेष्ठ नागरिक उपस्थित होते. अशाप्रकारे उत्तम संचालनात दामोदर नाट्यगृहाचा शताब्दी सोहळा पार पडला. या सोहळ्याबाबत सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सोहळा समितीचे समन्वयक सौ. उमा शेट्ये, राजन शंकर बने व प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांनी सर्वांचे आभार मानले.
रिपोर्टर