ठाकरेंना मशाल कशी दिली? ते आमचं चिन्ह, समता पक्ष निवडणूक आयोगात जाणार

मुंबई : उद्धव ठाकरे गटा समोर  अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. आधी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर  मशाल' ठाकरेंना मिळाली, त्यानंतर ऋतुजा लटके  यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असतानाच आता मशाल ही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेल्या समता पक्षाने  मशाल हे आपले निवडणूक चिन्ह असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतही  समता पक्ष उतरणार असल्याची चर्चा आहे.

१९९६ पासून मशाल हे आमचं पक्ष चिन्ह आहे, असं सांगत समता पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. खरंतर मशाल चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या गटाला सोपवताना ते समता पक्षाचं चिन्ह असल्याचं कारण निवडणूक आयोगाने नमूद केलं होतं. २००४ मध्येच त्यांची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेण्यात आली आहे.

दरम्यान, २०१४ पर्यंत आपण मशाल चिन्हासह निवडणुका लढवत होतो, असा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे. फक्त ठाकरेंना दिलासा इतकाच की पोटनिवडणुकी नंतर निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं सांगत आहेत. परंतु निवडणूक आयोगाने जर मशाल मुक्त चिन्हांच्या यादीतून ठाकरेंना दिली असेल, तर समता पक्षाच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे पाहावं लागेल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदेंना ढाल तलवार ही निशाणी देण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. निवडणुकीसाठी ठाकरे गटातर्फे ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिली आहे. तर शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना हे नाव वापरणार आहे.

संबंधित पोस्ट