चंदेरी पापलेट माशाच्या विशेष टपाल लिफाफ्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन

अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विशेष तिकीट काढण्यात येणार

■ मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.११ :  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून या निमित्ताने लवकरच विशेष तिकीट काढण्यात येईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


मत्स्य व्यवसाय विभाग आणि भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फिलाटेली दिवसाच्या निमित्ताने एक जिल्हा एक उत्पादन यासाठी मुंबई शहर जिल्हयासाठी चंदेरी पापलेट या माशाचे विशेष टपाल लिफाफ्याचे प्रकाशन श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, वन बल प्रमुखांचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय.एल.पी.राव, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाति पांण्डेय आदी उपस्थित होते.


श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मागील काळात वन मंत्री असताना वन विभागासाठी अनेक टपाल तिकीटे काढण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशासह राज्यात साजरा होत असताना या वर्षीही विशेष टपाल तिकीट काढण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असलेला टपाल विभाग अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांशी जोडलेला विभाग आहे.आपल्या सुख-दु:खांशी जोडल्या गेलेल्या या विभागाने  येणाऱ्या काळातही जनसेवेमध्ये अग्रेसर राहावे.


जागतिक फिलाटेली दिवस अर्थात टपालाच्या  तिकीटांचा संग्रह करण्याचा दिवस यानिमित्ताने एक जिल्हा एक उत्पादन यासाठी चंदेरी पापलेट यावर आधारीत विशेष टपाल लिफाफ्याचे अनावरण करण्यात आले. मुंबई शहरात समुद्राचा मोठा भाग असल्याने एक जिल्हा एक उत्पादनासाठी मत्स्य व्यवसायाशी संबंधित उत्पादन निवडण्यात आला असल्याचे श्रीमती पांण्डेय यांनी आपल्या निवेदनात सांगितले.

संबंधित पोस्ट