
काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ तारखेला टिळक भवन येथे मतदान !: बी. पी. सिंग.
निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा आढावा.
- by Reporter
- Oct 11, 2022
- 265 views
मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टो बरला मतदान होत असून या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पथकाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन पाहणी केली. काँग्रेस पक्षात लोकशाही पद्धतीने अध्यक्षपदाची निवडणूक होत असते. ही निवडणूक निपःक्षपाती होणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक प्राधिकरणचे सदस्य तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. पी. सिंग यांनी दिली.
बी. पी. सिंग पुढे म्हणाले की, १७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय, टिळक भवन, दादर येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मतदारांना मतदान करता येणार आहे. यावेळी राज्यातील ५६५ प्रदेश प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावतील. पक्षाच्या या मतदारांना पक्षाने दिलेले ओळखपत्र व आधार कार्ड किंवा फोटो ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. १९ तारखेला दिल्लीत मतमोजणी करून त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे. जेष्ठ नेते व माजी मंत्री मल्लिकार्जून खर्गे व माजी मंत्री खासदार डॉ. शशी थरूर हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीतून आलेल्या पथकामध्ये केंद्रीय निवडणूक प्राधिकरणचे सदस्य तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. पी. सिंग, प्रदेश निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सहाय्यक प्रदेश निवडणूक अधिकारी दिनेश कुमार, के. एल. पुनिया, नरेंद्र रावत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
रिपोर्टर