नाट्य क्षेत्रातील नवा विक्रमवीर सलग १२ प्रयोग करून आकाश भडसावळे ने मोडले जुने विक्रम!

मुंबई :मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अतूट नातं आहे. महाराष्ट्राला नाटकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. नाटक गंभीर असो, विनोदी असो, सस्पेन्स असो किंवा संगीत नाटक; दर्दी रसिक मराठी नाटकांना आवर्जून उपस्थित राहतात. नाट्य क्षेत्रामध्ये यापूर्वी काही विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. अनेक प्रथितयश अभिनेते, संस्था किंवा त्यांच्या नाटकांच्या नावाने त्यांची नोंद घेतली गेली आहे. मात्र आजवर केले गेलेले सगळे जुने विक्रम मोडीत काढून अभिनेता आकाश भडसावळे याने एकाच दिवसात सलग १२ प्रयोगांचा नवीन विश्वविक्रम रविवार दि. ९ ऑक्टोबर या दिवशी नुकताच पूर्ण केला. 'करनाटकू' संस्थेची निर्मिती आणि प्रसिद्ध व्यावसायिक निर्मिती संस्था 'अभिजात' च्या पाठिंब्याने ठाणे आणि मुलुंड येथे हे यशस्वी प्रयोग सादर झाले. यावेळी एकूण ३ नाटकांचे प्रत्येकी ४ असे १२ प्रयोग सादर झाले. योगेश सोमण लिखित सस्पेन्स 'टेलिपथी', सुयश पुरोहित लिखित व दिग्दर्शित ब्लॅक कॉमेडी 'मरणोत्पात' आणि इरफान मुजावर लिखित 'अस्थिकलश' या नाटकाचे प्रयोग सादर केले गेले.यावेळी हास्यजत्राच्या काही कलाकारांची आणि आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, व्यास क्रिएशन्स चे संचालक निलेश गायकवाड यांची उपस्थिती होती.


अभिनेता आकाश भडसावळे त्याच्या चरित्र भूमिकांसाठी ओळखला जातो. 'होय मी सावरकर बोलतोय' नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर, कै. विश्राम बेडेकर लिखित प्रसिद्ध नाटक 'टिळक आणि आगरकर' नाटकातील सुधारक गोपाळ गणेश आगरकर अशा त्याच्या काही गाजलेल्या भूमिका आहेत. सध्या 'वासूची सासू' हे त्याचे विनोदी नाटक रंगभूमीवर तुफान गाजतंय; ज्यात (पद्मश्री) नयना आपटे, अंकुर वाढवे, अमोघ चंदन अशी दिग्गज कलाकार मंडळी काम करीत आहेत. पूर्वी दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेली नाटकातील अण्णांची भूमिका स्वतः आकाश भडसावळे करीत आहे.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला यावर्षी आकाशने मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी ३ क्रांतिकारी नाटकांचा महोत्सवही केला होता ज्याला अतुल परचुरे, कुमार सोहोनी, योगेश सोमण, नाट्य व्यवस्थापक गोट्या सावंत यांची हजेरी होती. असा उपक्रम करणारा आकाश भडसावळे आणि अभिजात संस्था हे एकमेव होते. यावेळी अनेक दिग्गज कलाकारांचा सत्कारही करण्यात आला होता.


आकाशने केलेला हा नवा विश्वविक्रम अनेक रंगकर्मी आणि अभिनेत्यांना नक्कीच आश्वासक आहे. या विक्रमाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या सोबत असलेल्या कलाकारांनाही हा अनुभव अतिशय रोमांचकारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर या उपक्रमासाठी ललित कला केंद्र पुणे ची विद्यार्थिनी प्राची सहस्रबुद्धे, लेखक-दिग्दर्शक सुयश पुरोहित, ज्येष्ठ रंगकर्मी राजन मयेकर, बालनाट्य प्रशिक्षिका रश्मी घुले, अथर्व गोखले, सुमित चौधरी, दिक्षा शिंदे, दीपक जोईल, सुरज पास्ते, नितेश पाटील, प्रतिक बारणे, श्रीनिवास ओक, अपर्णा मोडक, उन्नती नावळे, राहुल गोरीवले, अस्मिता जोशी, श्रुती हळदणकर, साहिल खाड्ये, संदीप येवले आदी कलाकारांची दिवस रात्रीची मेहनत यामुळेच हा विश्वविक्रम करता आल्याचे आकाश भडसावळे याचे म्हणणे आहे. या प्रयोगांचे व्यवस्थापन राकेश तळगावकर, तसेच सूत्रधार सुरेश भोसले यांचेकडे होते. या उपक्रमासाठी व्यास क्रिएशन्स यांचे प्रायोजकत्व होते.

मराठी माणसांची आणि नाट्य क्षेत्रातील प्रतिभावंत रंगाकर्मींची मान अभिमानाने उंचावणारा हा विश्वविक्रम आहे.

संबंधित पोस्ट