ई रिक्षाच्या समर्थनार्थ माथेरानकरांचा नगरपालिकेवर भव्य मोर्चा!
- by Reporter
- Oct 03, 2022
- 234 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड) ई रिक्षा 15 ऑक्टोबर पूर्वी सुरू करण्याची मागणी करता आज सोमवार दि.3 ऑक्टोबर रोजी नगरपालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने दि. 12 मे रोजी माथेरानला ई रिक्षा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला, गेल्या चार महिन्यांपासून माथेरानची जनता ई रिक्षेच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकारने दि. 3 जून रोजी माथेरान पालिकेला पत्र पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे, दि. 27 जुलै रोजी ई रिक्षाचे मॉडेल ची क्षमता पाहण्यासाठी एक दिवसीय चाचणी रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सुचने नुसार घेण्यात आली होती,या चाचणी दरम्यान महिंद्रा कंपनीची रिक्षा माथेरानच्या रस्त्यावर तग धरू शकेल असा निष्कर्ष यावेळी काढण्यात आला होता.मात्र घोडेवाल्यांनी दोनदा मोर्चा काढून ई रिक्षाला विरोध दर्शवला होता.
माथेरान व्यापारी संघटनेच्या माध्यमातून आजच्या समर्थन मोर्चाचे आयोजन केले होते.भाजप, आर पी आय, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, मनसे, शेकाप, ज्येष्ठ नागरिक संघ, दिव्यांग सेवा संघटना, धोबी समाज, लॉजिंग चालक मालक संघटना, कुशल कामगार संघटना, स्टेशन हमाल संघटना, गुजराती समाज, रग्बी विभाग रहिवाशी, वन ट्री हिल विभाग रहिवासी, भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, रिक्षा संघटना, युवा रुखी गुजराती समाज, भारतीय बौद्ध महासभा, चर्मकार समाज, सेंट झेवीयर्स पालक माथेरान गव्हाणकर एजुकेशनट्रस्टच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील,संघ व हॉटेल असोसिएशन यांनी उस्फूर्त सहभाग नोंदणून ई रिक्षाला पाठिंबा दिला माथेरानच्या नागरिकांनी आज सर्व व्यवहार बंद ठेवून या मोर्चात सहभाग घेतला
माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना संघटनेच्यावतीने राजेश चौधरी यांनी निवेदन दिले. यावेळी माथेरानचे अधिक्षक दिक्षांत देशपांडे, माथेरान पोलीस स्टेशन उपनिरीक्षक शेखर लव्हे उपस्थितीत होते. यावेळी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत ई रिक्षा सुरू करण्याचे आश्वासन उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश चौधरी यांनी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. दिवाडकर हॉटेल ते पांडे प्ले ग्राउंड पर्यंतचे पेव्हर ब्लॉक काम तात्काळ सुरू करण्याचे ठेकेदारास आदेश देण्याची मागणी केली. एमएमआरडीए चे प्रतिनिधी विजय पाटील यांनी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची ग्वाही दिली.
योगेश जाधव, शिवाजी शिंदे, व राजेश चौधरी यांनी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या बरोबर झालेल्या चर्चेची उपस्थितांना माहिती दिली तर याचिकाकर्ते सुनिल शिंदे यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, प्रकाश सुतार, आकाश चोधरी,संघटनेचे उपाध्यक्ष यतीश तावडे, सचिव मनोज जांभळे, कुलदीप जाधव अनंता शेलार आदी सह माथेरानकर मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या करता माथेरान पोलीस स्टेशन चे एपीआय शेखर लव्हे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
रिपोर्टर