
श्री संत राममारूती महाराज संस्थान चे अध्यक्षपदी श्री शिरीषजी गडकरी यांची बिनविरोध निवड!
- by Reporter
- Aug 10, 2022
- 449 views
कल्याण : श्री साईबाबाचे समकालीन असलेले ,सिध्दयोगी म्हणून ख्याती पावलेल्या श्री संत राममारूती महाराजांचे कल्याण येथे दुधनाक्याजवळ समाधी स्थान वसलेले आहे, अतिशय प्रसिद्ध व जागृत स्थान म्हणून ख्याती पावलेल्या, या स्थानी मागील अनेक वर्षे, श्री गडकरी हे या संस्थानची यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. श्री गडकरी यांच्या कारकिर्दीत संस्थानने अनेक संस्मरणीय कामं केली, त्यांच्या कारकिर्दीत मंदिराचे गाभ्या-यांत श्री राममारूती महाराजांचे मूर्तीस्थापनेचा सोहळा साजरा झाला तसेच संपूर्ण गाभारा चांदीच्या पत्र्याने सुशोभित करण्यात येवून मूर्ती भोवती चांदीचे सिंहासन बनविण्यात आले. अलिकडे ठाणे येथील प्रसिद्ध सिध्देश्वर संत श्री गजानन महाराज पट्टेकर उर्फ श्री अण्णा साहेब पट्टेकर महाराजांचे संगमरवरी मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आणि भव्य प्रमाणावर संपन्न झालेला,श्री संत राममारूती महाराजांचा शतक महोत्सवी पुण्यतिथी उत्सव, श्री गडकरी यांच्या कारकिर्दीत संपन्न झाला.
नुकतीच श्री संत राममारूती समाधी संस्थानचे सभासदांची बैठक होवून सर्वांनूमते सन २०२२ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी, ठाणे निवासी श्री शिरीषजी अनंत गडकरी, यांची संस्थानचे अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या त्यांच्या निवडी बद्दल सर्व सदस्यांनी आनंद व्यक्त करत, त्यांना शुभेच्छा दिल्या.
आपली सतत ६ व्या वेळी, "अध्यक्ष " म्हणून नेमणूक केली केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानून सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. तसेच श्री राममारूती महाराजांच्या जागृत स्थानाचे सेवा करण्यास मिळाली म्हणून आनंद व्यक्त करत, यापुढे ही आपल्या हातून श्री राममारूती महाराजांची अखंड सेवा होत राहो,अशी श्री राममारूतीचें चरणी मनोभावे प्रार्थना करून , सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत, संस्थानाची उत्तरोत्तर प्रगती माझ्या कडून, श्री राममारूती महाराज माझ्याकडून करून घेवोत, अशी मनोभावे प्रार्थना श्री गुरु श्री राममारूती महाराजांचे समाधी स्थानी केली.
रिपोर्टर